अपुरे शिक्षकच ओढताहेत झेडपी शाळांचा गाडा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • येवल्यात ८३ शिक्षक, १८ मुख्याध्यापकांसह ११६ जागा रिक्त

येवला - दोनदा पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे दोन वेळा अध्यक्षपद मिळूनही तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेले अपुऱ्या शिक्षकसंख्येचे ग्रहण पंधरा-वीस वर्षांनंतरही सुटलेले नाही. आजही तालुक्‍यात शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांच्या तब्बल ११६ जागा रिक्त आहेत. यामुळे अध्ययन-अध्यापनाचा खेळखंडोबा होऊन गुणवत्तेचा प्रश्‍न निर्माण होऊ पाहत आहे. शिक्षकभरतीच होत नसल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांना ‘गुरुजी देता का गुरुजी’ असे दर वर्षी म्हणावे लागत आहे.

एकीकडे शासन आरटीई कायद्याचा बागुलबुवा दाखवून आठवीपर्यंत शिक्षण सक्तीचे करीत आहे, तर दुसरीकडे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्‍यक शिक्षक देण्याची काळजी सोयीस्कर दुर्लक्षित केली जात आहे. यामुळे अनेक पालक मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत टाकावे की नाही, अशा विवंचनेत आहेत. जिल्हा परिषदेच्या काही शाळांनी गुणवत्तेत बाजी मारून इंग्रजी माध्यमाच्या मुलांना आकृष्ट केल्याने शाळांची क्रेझ वाढत आहे. मात्र, पालकांचा वाढलेला विश्‍वास वर्षानुवर्षे अपुऱ्या शिक्षकांमुळे उडण्याचीही भीती आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सन २०१४ मध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, तर त्यांनी मायावती पगारे व राधाकिसन सोनवने यांना सलग पाच वर्षे अध्यक्षपदाची संधी दिली. त्यांनाही येथील शाळांना पूर्णपणे शिक्षक देता आलेले नाहीत. तेव्हा आता काय होईल, असा प्रश्‍नच आहे.

 या वर्षी २२ शिक्षक बदलून गेले आणि ३१ शिक्षक आले. तरीही येथील शाळांना पदवीधर ३६ व उपशिक्षक ४७ अशी शिक्षकांची ८३ पदे रिक्त आहेत. अनेक तीन-चार शिक्षकी शाळा एका शिक्षकावर, तर कुठे पाच- सहा शिक्षकांची गरज असताना दोन ते तीन जण कार्यरत आहेत. १८ शाळांना मुख्याध्यापक नसल्याने वरिष्ठ शिक्षकांनाच आपले काम सांभाळून हे ओझे उचलावे लागत आहे. केंद्रप्रमुखांची अठरा पदे मंजूर असताना तब्बल १२, तर विस्तार अधिकाऱ्यांची सहा पदे मंजूर असताना तीन पदे रिक्त आहेत. यामुळे कामकाज विस्कळित होऊन संबंधित शाळांतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News