महाविद्यालयीन प्रवेशाचे महत्त्वाचे टप्पे जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • राज्यातील शासकीय, स्वायत्त तसेच खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी एमएचटी - सीईटी २०१९ परीक्षा सीईटी सेल मुंबईतर्फे प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल नुकताच लागला.

राज्यातील शासकीय, स्वायत्त तसेच खासगी महाविद्यालयातील प्रवेशासाठी एमएचटी - सीईटी २०१९ परीक्षा सीईटी सेल मुंबईतर्फे प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली असून, या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. ही परीक्षा इंजिनिअरिंग बरोबरच फार्मसी, कृषी प्रवेशासाठीही असल्याने परीक्षा ३.९२ लाख विद्यार्थ्यांनी दिली. तरीही खऱ्या अर्थाने फक्त इंजिनिअरिंगसाठी इच्छुक असलेले, म्हणजे फक्त पीसीएम ग्रुप घेणारे १.११ लाख विद्यार्थी आहेत. पीसीएमबीच्या १.६५ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असली, तरीही त्यापैकी खूपच थोडे विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी इच्छुक असतात.

विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त जागा असल्यामुळे प्रवेश तर प्रत्येकाला मिळणारच आहे; परंतु खरी स्पर्धा असेल चांगल्या शाखा व उत्कृष्ट महाविद्यालयातील प्रवेशासाठीच. एमएचटी-सीईटी परीक्षेची की-आन्सर्स संकेतस्थळावर जाहीर झाले असल्यामुळे प्रत्येकाला आपल्या गुणांचा अंदाज आलाच आहे. जेईईकडे खूप लक्ष देऊनही कमी गुण मिळाले व जेईईकडेच लक्ष दिल्यामुळे एमएचटी- सीईटीमध्येही कमी गुण मिळाले तरीही पर्याय नसल्यामुळे आता एमएचटी- सीईटीमधूनच प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रवेशप्रक्रियेचे टप्पे जाणून घ्यावेत.

प्रवेशप्रक्रिया माहितीपुस्तिका प्रकाशित करणे - 
अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट, तसेच थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी, फार्मसी शाखांमधील प्रवेशासाठी एकत्रित नियमावली तयार करून राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एक खिडकी पद्धतीने (केंद्रीभूत) प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. प्रवेशासाठी वेळापत्रक व नोटिफिकेशन www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर होते. 

रजिस्ट्रेशन, नावनोंदणी - 
एमएचटी सीईटी निकालानंतर पात्र व इच्छुक उमेदवारांकडून संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केली जाते. नावनोंदणी म्हणजे संस्था किंवा शाखांचे पसंतीक्रम देणे नसून, ज्याप्रमाणे परीक्षेचा अर्ज भरला, त्याचप्रमाणे आपली वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरणे, सीईटी व जेईईमधून गुण नोंदविणे, फोटो, स्वाक्षरी अपलोड करणे व कन्फर्मेशन पेजची प्रिंट घेणे असे टप्पे असतात.

कागदपत्रांची पडताळणी -
राज्यातील अनेक महाविद्यालयांना सुविधा केंद्र म्हणून मान्यता मिळते. या सुविधा केंद्रात जाऊन विद्यार्थ्याने व्यक्तिशः आपल्या भरलेल्या अर्जाची व कागदपत्रांची पडताळणी मूळ कागदपत्रे व झेरॉक्‍स संच सादर करून करावी लागते. विद्यार्थ्याला पडताळणीनंतर पोचपावती मिळते.

मेरिट जाहीर करणे -
तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे व त्यानंतर आक्षेप असल्यास दाखल करून घेऊन अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे, त्यानुसार राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला राज्यातील क्रमांक, विद्यापीठातील क्रमांक, तसेच राखीव गटासाठी राज्यातील राखीव व विद्यापीठातील राखीव असे क्रमांकाचे वाटप होते. 

जागावाटप - 
संकेतस्थळावर केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) फेरीसाठी उपलब्ध असलेल्या प्रवर्गनिहाय जागांची रचना जाहीर करणे.
    
विकल्प नोंदविणे -
कॅपच्या पहिल्या फेरीसाठी शाखा व संस्था यांचा पसंतीक्रम असणारा ऑनलाइन विकल्प नमुना भरणे व त्यास पुष्टी देणे म्हणजेच कन्फर्म करणे, कन्फर्म केल्यानंतरच तो अर्ज प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीसाठी ग्राह्य धरला जातो.

पहिल्या फेरीचे प्रवेश जाहीर करणे, त्यानंतर एआरसी - 
ॲडमिशन रिपोर्टिंग सेंटरवर जाऊन प्रवेश निश्‍चित करणे, दुसऱ्या फेरीसाठीच्या शिल्लक जागांची माहिती देणे अशाच पद्धतीने पुढील फेऱ्या राबविणे व शेवटच्या फेरीनंतर प्रवेश निश्‍चितीकरण व प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश घेणे असे महत्त्वाचे टप्पे आहेत.
    
अत्यंत महत्त्वाचे - 
तंत्रशिक्षण संस्थेतर्फे प्रवेश प्रक्रियेची नियमावली अत्यंत विचारपूर्वक तयार करण्यात आली असून, प्रथम दर्शनी प्रक्रिया किचकट वाटत असली, तरी प्रत्यक्षात अतिशय सोपी व पारदर्शी आहे. एकूण तीन फेऱ्या, प्रत्येक फेरीसाठी नव्याने विकल्प अर्ज नोंदविण्याची सोय, ३०० विकल्प नोंदविण्याची सोय, जागा वाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष संस्थेत प्रवेशासाठी जाण्याची आवश्‍यकता नसून, प्रवेश निश्‍चिती केंद्रावर फ्रिज, स्लाइड, फ्लोट पर्याय निवडून प्रवेश निश्‍चित करावा.

पुढील प्रत्येक फेरीसाठी अधिक चांगल्या जागेचा (बेटरमेंट) पर्याय उपलब्ध आहे. शेवटच्या फेरीनंतरच प्रत्यक्ष संस्थेत जाऊन प्रवेश घ्यावा. अशी पद्धत मागील वर्षी होती, प्रवेश प्रक्रियेच्या फेऱ्यांच्या नियमामध्ये मागील १३ वर्षापासून दरवर्षी किरकोळ बदल होतच राहतात. त्यामुळे जूनमध्ये नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर नवीन नियमांचा अभ्यास करावा.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News