'मोदी लाटे’चा प्रभाव कायम! 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • लोकसभा निवडणुकीत ‘बविआ’ला कमी मते मिळाली
  • बहुजन विकास आघाडीला  लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश

पालघर: भाजप-शिवसेना युतीला वाढलेला प्रतिसाद आणि बहुजन विकास आघाडीला (बविआ) लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश यामुळे येथे विधानसभेला चुरस वाढणार आहे. ‘बविआ’ला किल्ला राखता नाही आला, तर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. 

पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, डहाणू आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला दोन, तर शिवसेनेला एका जागेवर भगवा फडकवता आला होता. तीन मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचा (बविआ) वरचष्मा राहिला. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीचे राजेंद्र गावित निवडून आले आणि पालघर मतदारसंघात मोदी लाटेमुळे राजकीय समीकरणे बदलली. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये युती कायम राहिल्यास हा बदलही कायम राहील, असेच चित्र आहे. 

पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेनेने जबाबदारी दिली आहे. त्यांनी जिल्ह्यात दौरे आणि भेटीगाठी सुरू केल्या आहेत. २०१४ मध्ये डहाणू, विक्रमगडमध्ये भाजपने मुसंडी मारली असली, तरी लोकसभेत कम्युनिस्ट पक्षाने (सीपीआय) आपली मते आजमावत ‘बविआ’ला पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधानसभेत कम्युनिस्ट पक्षही ताकदीने उभा राहणार असल्याचे बोलले जाते. बोईसर, नालासोपारा आणि वसई मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत ‘बविआ’ला कमी मते मिळाली. ‘बविआ’चे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यालाही हादरा बसला. नालासोपाऱ्यातून ‘चकमक’फेम माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा शिवसेनेकडून रिंगणात उतरतील, असे बोलले जाते. त्यांनी काही स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्याचे समजते. या मतदारसंघात ‘बविआ’चे आमदार क्षितिज ठाकूर उतरल्यास शर्मा यांच्याशी त्यांची राजकीय मैदानावरील ‘चकमक’ रंगू शकते. यात उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. मात्र, ठाकूर कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप अस्पष्ट आहे.

बोईसर, नालासोपारा आणि वसईचा बालेकिल्ला राखण्यासाठी ‘बविआ’ शर्थीचे प्रयत्न करणार, यात शंका नाही. बोईसरमध्ये ‘बविआ’कडून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार असल्याचेही बोलले जाते. वसईतून श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित यांना युतीकडून संधी आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शब्दानुसार श्रीनिवास वनगा यांना कोणत्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळेल, हे अद्याप अनिश्‍चित आहे. लोकसभा निवडणुकीत युतीने पालघरवर भगवा फडकवला. मंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण पालघर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांवर लक्ष ठेवून आहेत; मात्र युतीच्या जागावाटपानंतरच इथले खरे चित्र स्पष्ट होईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News