प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय जमिनीवर पाहिजेत :मधुरा देशपांडे

काजल डांगे
Saturday, 6 April 2019

अभिनेत्री मधुरा देशपांडेला नावलौकिक मिळाला तो 
‘असे हे कन्यादान’ या मालिकेमुळे. तिच्या गायत्री या भूमिकेने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.  त्यानंतर मधुरा मोजक्‍याच मराठी चित्रपटांमध्ये झळकली. मुळातच क्‍लासिक डान्सर असणारी मधुरा जवळपास दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर ती ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘जीवलगा’ या मालिकेत दिसणार आहे. तिचा एकूणच इथवरचा प्रवास नेमका कसा होता? हे तिच्याकडूनच जाणून घेतले...

अभिनेत्री मधुरा देशपांडेला नावलौकिक मिळाला तो ‘असे हे कन्यादान’ या मालिकेमुळे. तिच्या गायत्री या भूमिकेने प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं.  त्यानंतर मधुरा मोजक्‍याच मराठी चित्रपटांमध्ये झळकली. मुळातच क्‍लासिक डान्सर असणारी मधुरा जवळपास दोन वर्षांनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सज्ज झाली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि अभिनेता स्वप्नील जोशीबरोबर ती ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘जीवलगा’ या मालिकेत दिसणार आहे. तिचा एकूणच इथवरचा प्रवास नेमका कसा होता? हे तिच्याकडूनच जाणून घेतले...

मी  मुळात क्‍लासिकल डान्सर आहे. क्‍लासिकल डान्सिंगपासूनच माझ्यात अभिनयाची गोडी निर्माण झाली. पण करिअरच अभिनय क्षेत्रात करायचं असं काही ठरलं नव्हतं. योगायोगाने मला संधी मिळत गेल्या आणि माझं अभिनयाच करिअर झालं. माझ्या अभिनयाची सुरुवात झाली ती नाटकांपासून. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेताना नाटकात काम करायचे. महाविद्यालयीन नाटकांमध्ये माझा सहभाग असायचा. एकदा नाटकाची रिहर्सल सुरू असताना रिहर्सल हॉलच्याच काही अंतरावर एका मालिकेसाठी ऑडिशन्स सुरू होत्या. नाटकाची रिहर्सल संपली आणि मी सहजच ऑडिशन द्यायला गेले आणि त्या वेळी माझी निवडही झाली. पहिलीच ऑडिशन आणि ती यशस्वी झाली म्हटल्यावर मलाही या क्षेत्रात गोडी वाटू लागली.

खऱ्या अर्थाने माझी ओळख निर्माण झाली ती ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘असे हे कन्यादान’ या मालिकेमुळे. या मालिकेत मी गायत्री ही व्यक्तिरेखा साकारली होती. आजही मी कुठे बाहेर गेले की लोक मला ‘गायत्री’ नावानेच हाक मारतात. पाच ते सहा वर्षांपूर्वी मी गायत्री ही भूमिका साकारली आणि आजही प्रेक्षकांच्या मनात ही भूमिका घर करून आहे. मला वाटतं, हीच माझ्या कामाची पोच-पावती आहे. मुख्य भूमिका असणारी माझी ही पहिलीच मालिका आणि प्रेक्षकांनी मला दिलेलं भरभरून प्रेम नेहमीच माझ्यासाठी स्पेशल राहिलं. एक किस्सा सांगते, मला एकदा एक आजी आणि त्यांचा नातू भेटला. त्यांनी मला सांगितलं, मला गायत्रीसारखीच मुलगी, सून पाहिजे. इतकी मी प्रेक्षकांना आपलीशी वाटले. यासारखा दुसरा आनंद असूच शकत नाही. 

मी या क्षेत्रात करिअर करू शकले; याचं कारण म्हणजे माझ्या घरचे माझ्या पाठी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या आई-बाबांनी कधीच अभिनयक्षेत्रात काम करायला विरोध केला नाही. आणि लग्नानंतरही सासरचेही मला तितकेच सांभाळून घेतात. मी या क्षेत्रात काम करते याचा त्यांना अभिमानच वाटतो. माझी आई नेहमीच मला सांगते की, समोरची कोणतीही गोष्ट आपल्याला चांगली वाटली की तो चांगुलपणा पटकन आपल्याला टिपता आला पाहिजे. मीही तोच प्रयत्न करते. प्रत्येक दिवशी एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून मी काहीतरी नवीन शिकत आहे. कितीही फेम, प्रसिद्धी मिळाली तरी आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. एक उत्तम कलाकाराच्या जोडीने तुम्ही एक चांगली व्यक्ती असणंही तितकंच गरजेचं आहे. 

विशेष म्हणजे दोन वर्षांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतले आहे. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘जीवलगा’ या मालिकेत मी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतरची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेमध्ये मी अमृता खानविलकर, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर यांच्याबरोबर काम करत आहे. सिद्धार्थ आणि माझी अनोखी केमिस्ट्री या मालिकेमधून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. खरं तर आम्ही दोघांनी ‘गुलाबजाम’ चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण माझी भूमिका फारच छोटी होती. ‘जीवलगा’च्या निमित्ताने पुन्हा त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळतेय. माझ्या करिअरची सुरुवात ‘स्टार प्रवाह’ वाहिनीपासून झाली. म्हणून या मालिकेचं चित्रीकरण करताना घरी परत आल्याची फिलिंग मला येते. प्रत्येक जॉनरच्या चित्रपटांमध्ये मला काम करायचं आहे. अभिनेत्री स्मिता पाटील प्रेरणा असून त्यांच्यासारखं काम करायचं आहे. माझे ड्रीम रोल आहेत जे मी यापुढे करणार आहे. पण सध्या तरी ‘जीवलगा’ मधून प्रेक्षकांनी कधी न पाहिलेली मधुरा सगळ्यांसमोर येणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News