इशारा मिळाला तर २४ तासांत सरकार पाडू, भाजपचा इशारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • आदेश मिळताच सरकार पाडू
  • मध्य प्रदेशात भाजप नेते गोपाळ भार्गव यांच्या वक्तव्याने खळबळ

भोपाळ : कर्नाटकमधील काँग्रेस आणि जेडीएस आघाडीचे सरकार पाडल्यानंतर आता मध्य प्रदेशातील कमलनाथ यांचे सरकारदेखील भाजप श्रेष्ठींच्या रडारवर असल्याचे बोलले जाते, ज्या दिवशी आमच्या पक्षाच्या क्रमांक एक आणि क्रमांक दोनकडून इशारा मिळेल तेव्हा चोवीस तासांमध्ये हे सरकार पाडू, त्यांना एक दिवस देखील काम करता येणार नाही, असे वक्तव्य विरोधी पक्ष नेते गोपाळ भार्गव यांनी आज विधिमंडळात बोलताना केल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला.

भार्गव यांच्या या वक्तव्याला मुख्यमंत्री कमलनाथ यांनीही जशास तसे प्रत्युत्तर दिले. तुमचे क्रमांक एक आणि क्रमांक दोन हे समजूतदार आहेत, त्यामुळेच ते तसे आदेश देत नाहीत, पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आमच्याविरोधात अविश्‍वासदर्शक ठराव मांडू शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

तुम्ही रोज आमचे सरकार अल्पमतात असल्याचा सूर आळवत असता आज होऊनच जाऊ द्या दोन हात, असे थेट आव्हान कमलनाथ यांनी भाजप नेत्यांना दिले, या वेळी बहुजन समाज पक्षाच्या आमदार रामबाईसिंह यांनी कमलनाथ यांचे सरकार अंगदाच्या पायांप्रमाणे अढळ असल्याचे सांगितले.
 

"एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्यावर कसलेच आरोप झाले नाहीत, आमचे आमदारही इतरांप्रमाणे विकावू नाहीत."

- कमलनाथ, मुख्यमंत्री मध्य प्रदेश
 

"काँग्रेसची उलटगणती सुरू झाली असून कर्नाटकची हवा मध्य प्रदेशपर्यंत पोचेल. आता काँग्रेस सरकारचे पिंडदान होईल."

- गोपाळ भार्गव, विरोधी पक्षनेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News