मॅचफिक्स असेल, तर सामने खेळून काय फायदा? राज ठाकरेंचा ईव्हीएमवरुन टोला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • ईव्हीएममुळे ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ, राज ठाकरेंचा दावा

  • ३० वर्षांपासून ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली जाते- राज ठाकरे

मुंबई : ईव्हीएम मशिनवर लोकांचा विश्वास राहिला नाही, तरीसुध्दा निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमचा वापर का केला जातो? गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएम मशिनवर शंका उपस्थित केली जात आहे. ईव्हीएमवरुन लोकांचा विश्वास नसल्याने बॅलेट पेपरद्वारेच मतदान झाले पाहिजे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

2019 लोकसभा निवडणुकीत ३७० लोकसभा मतदारसंघात घोळ असल्याचा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे.  

सोमवार दिनांक 8 जुलै रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी मीडियासोबत बोलताना निवडणूक आयोगासह भाजपावर देखील जोरदार टीका केली आहे.  

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवडणूक आयोगासह भाजपवरही जोरदार टीका केली. ज्या देशात दोन महिने निवडणुका चालतात, तिथे दोन दिवस मतमोजणी झाली तर बिघडले कुठे? त्याचसोबत गेल्या ३० वर्षांपासून ईव्हीएमवर लोक संशय घेत आहेत. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास त्यात स्पष्टता येईल आणि लोकांचा विश्वासही बसेल, असे सांगतानाच ३७० लोकसभा मतदारसंघात ईव्हीएममुळे घोळ झालाय. काही मतदारसंघात जास्तीचे मतदान मोजले गेलंय, याकडेही निवडणूक आयोगाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगाला ईव्हीएम संदर्भातील सर्व मुद्दे पटवून दिले आहेत; पण त्यांच्याकडून आम्हाला शून्य अपेक्षा आहेत. तुम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? असा सवाल माध्यमांनी करू नये म्हणून ही औपचारिक भेट घेतली आहे, असं ते म्हणाले.

ईव्हीएमची चीप अमेरिकेतून येते. ईव्हीएम मशीन हॅक होण्याची शक्यता आहे, असं असतानाही निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तयार नाही. जर मॅचच फिक्स असेल तर सामने खेळून काय फायदा? असा सवाल राज ठाकरेंनी त्यावेळी उपस्थित केला.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News