पवार, आंबेडकरांना सत्ता हवी असेल तर आमच्यासोबत यावं : आठवले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

कोल्हापूर - ‘लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा किंचित परिणाम झाला; पण दलितांना सत्तेपासून दूर ठेवणारी आघाडी म्हणजे वंचित आघाडी आहे. प्रकाश आंबेडकर आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एनडीएमध्ये सहभागी व्हावे,’ असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी येथे केले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. 

ते म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला आपली जागा कळाली आहे. तसेच, राहुल गांधींनाही तोंड दाखवायला जागा नाही. त्यामुळे शरद पवार यांच्यासह वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस सोडून एनडीएमध्ये सामील व्हावे.’’

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ एकच जागा जिंकली. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस सरस ठरली आहे. लोकसभेत वंचित आघाडीने फार प्रभाव टाकला म्हणता येणार नाही. वंचितचा किंचित परिणाम झाला आहे; पण वंचित आघाडी ही दलितांना सत्तेपासून वंचित ठेवत आहे. सत्तेत कसा वाटा मिळवायचा आणि मंत्रिपद मिळवायचे, ते माझ्याकडून शिकावे, असा सल्लाही आठवले यांनी दिला. 

विधानसभेला ३० जागा हव्यात
विधानसभा निवडणुकीत आरपीआयला ३० जागा दिल्या पाहिजेत. तसेच, ही निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, असे यापूर्वीही सांगितले असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News