जागतिक कसोटीचा अंतिम सामना ड्रॉ राहिला तर दोन्ही संघाना जेतेपद !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील अंतिम सामना ‘ड्रॉ’ किंवा ‘टाय’ झाल्यास संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) एकदिवसीय विश्‍वकरंडक अंतिम सामन्याच्या निर्णयावरून ठेच लागल्यावर शहाणपण आले आहे.

लंडन : पुढच्यास ठेच लागली की मागचा शहाणा होतो, या उक्तीप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीला (आयसीसी) एकदिवसीय विश्‍वकरंडक अंतिम सामन्याच्या निर्णयावरून ठेच लागल्यावर शहाणपण आले आहे. जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील अंतिम सामना ‘ड्रॉ’ किंवा ‘टाय’ झाल्यास संयुक्त विजेतेपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

‘आयसीसी’ने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाचादेखील पर्याय ठेवला आहे. अर्थात, याचा उपयोग जेव्हा पाच दिवसाच्या खेळात किती खेळ वाया जातो, यावर अवलंबून राहणार आहे. 

जागतिक कसोटी स्पर्धा दोन वर्षे चालणार असून, यात क्रमवारीतील पहिल्या नऊ देशांच्या संघाचा सहभाग असेल. एकूण २७ मालिका या कालावधीत खेळविल्या जाणार आहेत. अंतिम सामना १० ते १४ जून २०२१ मध्ये लॉर्ड्‌सवर होणार आहे. 

विश्‍वकरंडक एकदिवसीय स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड दरम्यान झालेला अंतिम सामना निर्धारित ५० षटके आणि सुपर ओव्हरनंतरही ‘टाय’ राहिला होता. तेव्हा सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजयी घोषित करण्यात आले होते. या निर्णयामुळे ‘आयसीसी’ला अनेक स्तरावरून लक्ष्य करण्यात आले 
होते.

टी-२० क्रिकेटमधील नियम त्यांनी एकदिवसीय अंतिम सामन्यासाठी वापरला होता. हे त्यांच्यावरील टीकेचे मुख्य कारण होते. त्यामुळे भविष्यात असा प्रसंग आल्यास निर्णय कसा घ्यायचा ? याचे उत्तर शोधण्यासाठी आता ‘आयसीसी’ची क्रिकेट समिती अभ्यास करणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जागतिक कसोटी स्पर्धा होत असल्यामुळे ‘आयसीसी’ने आधीच काळजी घेत यासाठी नवा नियम केला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News