इंग्रज नसते, तर भारतावर आज मराठ्यांचं राज्य आणि छत्रपतींचं सुशासन असतं : शशी थरुर

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Monday, 15 July 2019

आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या “मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टीव्हल ऑफ लेटर्स” या कार्यक्रमातील आहे.

मुंबईसध्या सोशल मीडियावर शशी थरुर यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे. यात त्यांनी इंग्रज भारतात आले नसते, तर भारतावर मराठ्यांचे राज्य असते, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच थरुर यांनी ब्रिटिशांसमोरच त्यांच्याकडून झालेल्या भारताच्या शोषणाची आकडेवारीसह पोलखोल केली होती. त्याचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

आता व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झालेल्या “मातृभूमी इंटरनॅशनल फेस्टीव्हल ऑफ लेटर्स” या कार्यक्रमातील आहे. या व्हिडीओत एक विद्यार्थीनी थरुर यांना प्रश्न विचारते, “जर व्यापारी बनून आलेले ब्रिटीश भारतात आलेच नसते, त्यांनी भारतावर राज्य केले नसते, तर आजचा भारत आजच्या सारखाच असता का? की काही वेगळा असता?” या प्रश्नाला उत्तर देताना शशी थरूर यांनी भारतीय इतिहासातील अनेक संदर्भ देत इंग्रजांचे भारतावर राज्य नसते तर मराठ्यांचे राज्य आणि सुशासन असते असे सांगितले. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांचेही उदाहरण दिले. थरुर म्हणाले, “अनेकजण इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे आपलं भाग्य असल्याचा युक्तीवाद करतात. कारण आपण लष्करीदृष्ट्या कमकुवत होतो. आपला भौगोलिक भागही तसा मोठा आणि वैविध्यपूर्ण होता. मात्र, जेव्हा ब्रिटीशांनी भारताच्या कारभारात हस्तक्षेप करत सत्ता काबिज करण्यास सुरुवात केली, तेव्हा भारतात मराठा साम्राज्य झपाट्याने वाढत होतं. त्यांचा मोठा प्रभाव होता. अगदी दक्षिणेला तंजावरपर्यंत मराठा साम्राज्य पोहचलं होते.”

मराठ्यांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत

मराठ्यांचे साम्राज्य दिल्लीपर्यंत असल्याचेही थरुर यांनी नमूद केले. “त्याकाळी मुघल साम्राज्याचा जवळजवळ अंत झाला होता. तेव्हा मुघलांचं नाव वापरुन मराठेच सर्व कारभार पाहत होते. जे काही आदेश (फर्मान) निघायचे त्याचं काय करायचं हे सर्व मराठेच पाहत. कोलकात्याकडं कूच करत असतानाही मराठ्यांनीच ब्रिटीशांना आडवले होते. मराठ्यांना 1761 ला पानिपतच्या लढाईत पराभव स्वीकारावा लागला. तेव्हा अब्दालीला भारतात राहून कारभार पाहायचा नव्हता. तो भारतात आला त्याने अनेकांना मारले, येथील खजिना लुटला आणि तो सर्व खजिना अफगाणिस्तानला घेऊन गेला. तेव्हा त्याला तोंड देण्याची ताकद केवळ मराठ्यांमध्येच होती,” असेही शशी थरुर यांनी सांगितले.

थरुर म्हणाले, “मी जेव्हा जगाच्या आणि भारताच्या इतिहासाचा विचार करतो, तेव्हा हेच दिसते की भारतीय उपखंडावर मराठ्यांचेच नियंत्रण होते. तेच येथील कारभार पाहत होते. सुरुवातीला त्याचे स्वरुप लष्करी स्वरुपाचे होते. जसं जपानमध्ये नामधारी राजाच्या नावावर इतर लष्करी सत्ता असलेले समुह कारभार पाहायचे, तसेच भारतात मराठे राज्य करत होते. या पद्धतीमुळे जपानसह जगभरात लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाली आणि लोकशाही रुजली. भारतातही असंच झालं असतं”

‘शिवाजी महाराज हे मराठ्यांमधील महान राजे’

शशी थरुर यांनी आपल्या या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांमधील महान राजे असल्याचंही सांगितले. ते म्हणाले, “शिवाजी महाजांनी त्यांच्या सैन्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की जर युद्धानंतर कुठंही कुराण सापडलं, तर ते कुराण परत देण्यासाठी जोपर्यंत एखादा मुस्लीम व्यक्ती भेटणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्या कुराणला सन्मानाने वागवले पाहिजे. असे आदेशच शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला दिले होते. जर मराठ्यांचे भारतावर साम्राज्य असते, तर अशीच धार्मिक सहिष्णुतेची परिस्थिती संपूर्ण भारतात तयार झाली असती. त्यातूनच जपानच्या धर्तीवर भारतातही महान लोकशाही आली असती.”

‘दक्षिण भारताला सांभर छत्रपती संभाजी महाराजांनी दिलं’

यावेळी थरुर यांनी मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती संभाजी महाराजांचाही आदराने उल्लेख केला आणि त्यांची विशेषता सांगितली. तसेच दक्षिण भारताला मिळालेले सांभार हे खाद्य पदार्थ संभाजी महाराजांनी शोधल्याचेही नमूद केले. थरुर म्हणाले, “संभाजी महाराज तंजावूरमध्ये राज्य करत असताना त्यांच्याकडे एकदा पाहुणे आले. संभाजी महाराज स्वतः आवडीने स्वयंपाकही करायचे.  त्यावेळी संभाजींना जेवण करण्यासाठी डाळ सापडली नाही. त्यामुळे त्यांना तंजावरमध्ये उपलब्ध सामुग्रीच्या आधारेच जेवण बनवले. संभाजींनी बनवलेले जेवण पाहुण्यांना प्रचंड आवडले. त्यावेळी संभाजींनी महाराष्ट्रात न आढळणारे पण तंजावरमध्ये असणाऱ्या साहित्यापासून खाद्यपदार्थ बनवले. त्याला संभाजी महाराजांच्या नावावरुनच सांभर हे नाव देण्यात आले. अशाप्रकारे मराठ्यांचे आपल्यावर साम्राज्य असल्यानेच दक्षिण भारताला सांभार पदार्थ मिळाला.”

 

जयंत पाटील यांच्याकडूनही थरुर यांचा व्हिडीओ शेअर

 

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील शशी थरुर यांचा हा व्हिडीओ फेसबूकवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना जयंत पाटील म्हणाले, “सुप्रसिद्ध लेखक शशी थरुर यांचा हा व्हिडियो माझ्या नुकताच पाहण्यात आला. एका विद्यार्थिनीने त्यांना असा प्रश्न विचारला की ‘ब्रिटिश भारतात आलेच नसते तर काय झालं असतं ?’ त्यावर थरुर यांनी उत्तर दिलंय की, ब्रिटिश भारतात आले नसते, तर आज भारतावर मराठा साम्राज्याचे राज्य असले असते आणि मराठ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या लोकशाही आणि सर्वधर्म समभावाच्या विचाराने संविधानिक मार्गाने देशावर राज्य केलं असतं!”

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News