स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे माझा पराभव - राहुल गांधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019
  • राहुल गांधी यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
  • लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर व्यक्त केले मनोगत 
  • स्मृती इराणी यांनी केला होता राहुल गांधी यांचा ५० हजारांहून मतांनी पराभव.

अमेठी : काँग्रेसचे स्थानिक नेते जनतेपासून दूर राहिल्याने लोकसभा निवडणुकीत आपला पराभव झाला, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले. स्थानिक नेत्यांमुळे पराभूत जरी झालो असलो, तरी मतदारसंघापासून दूर जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांचा ५० हजारांहून मतांनी पराभव केला.

गौरीगंज येथील निर्मलादेवी एज्युकेशनल इन्स्टिट्यूट येथे काँग्रेसच्या आढावा बैठकीत राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. अमेठी लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी प्रथमच दौऱ्यावर आले. त्यांनी आपल्या पराभवाला स्थानिक नेत्यांना जबाबदार धरले. यासंदर्भात काँग्रेस नेते नदीम अश्रम जयासी यांनी आढावा बैठकीत  राहुल गांधी यांनी मांडलेल्या भूमिकेची माहिती दिली.

राहुल म्हणाले, की पराभूत झालो तरी मी अमेठी सोडणार नाही. हे माझे घर आणि कुटुंब आहे. अमेठीच्या विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही. मी जरी वायनाडचा खासदार असलो, तरी तीन दशकांपासून अमेठीशी संबंध आहेत. अमेठीसाठी दिल्लीत लढा देईन. 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली, मात्र स्थानिक नेते मतदारांपासून दूर राहिल्याने आपला पराभव झाला, अशी खंत राहुल गांधी यांनी व्यक्त केली. 

एक कोटी फॉलोअर्स
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ट्विटरवर फालोअरची संख्या एक कोटीवर पोचली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त करत अमेठीत आनंदोत्सव साजरा करू, असे म्हटले आहे.

एक कोटी फॉलोअर झाल्यानंतर गांधी यांनी ट्विट करत,

‘एक कोटी फॉलोअर, आपल्यापैकी प्रत्येकाला मी धन्यवाद देत आहे. अमेठीत काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांची भेट घेतल्यानंतर तेथेच आनंद साजरा करू’ 

राहुल गांधी अमेठी दौऱ्यावर असून, ते पराभवानंतर प्रथमच अमेठी मतदारसंघात आले आहेत. त्यांना स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते. मात्र केरळच्या वायनाड मतदारसंघातून ते निवडून आले आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News