मी राजीनामा देतो निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या, ईव्हीएम मशिनमध्ये शंभर टक्के गडबड : उदयनराजेे भोसले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • खासदार उदयनराजेे भोसले यांचे निवडणूक आयोगाला आव्हान
  • विधानसभेला उमेदवार देऊ नका 

सातारा : ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमध्ये बहुतांश मतदारसंघामध्ये झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात फरक आढळला आहे, तरीही निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलत नाही. हा लोकशाहीचा घात आहे. काय व्हायचेय ते होऊ द्या; मी राजीनामा देतो, सातारा मतदारसंघातील निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असे खुले आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाला दिले.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्रगत देशांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु सर्वसामान्यांच्या खिशातून टॅक्‍सच्या माध्यमातून जाणाऱ्या पैशाचा ईव्हीएमसाठी अपव्यय चालला आहे. न्यायालये ईव्हीएमबाबत आग्रही राहात आहेत. सर्वोच्च न्यायालयच जर अशी भूमिका घेत असतील, तर न्याय कोणाकडे मागायचा?

ईव्हीएम एवढी सुरक्षित व तांत्रिकदृष्ट्या सक्षम असतील तर झालेले मतदान व मोजलेल्या मतदानात देशभरात जी तफावत आली त्याबाबत खुलासा करावा. याचिका दाखल करणाऱ्यालाच न्यायलयाने कारवाईची तंबी दिली आहे. माझे या दोघांना खुले आव्हान आहे. मी राजीनामा देतो. बॅलेट पेपरवर फेरनिवडणूक घ्या, असे आव्हानही त्यांनी दिले.

विधानसभेला उमेदवार देऊ नका 
ईव्हीएम मशिनमध्ये शंभर टक्के गडबड करता येऊ शकते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यायला पाहिजे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली नाही, तर सरळ सत्ताधाऱ्यांना बाय द्या. विधानसभेच्या निवडणुकीत कोणी उमेदवारच द्यायचा नाही. गडबड करून निवडून येणार हे माहिती असल्यामुळे त्यांना काय करायचेय ते करू द्या, असे आवाहनही उदयनराजेंनी सर्व विरोधी पक्षांना केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News