||अंहकाराचा वारा न लागो राजसा माझीया विष्णुदासां भाविकासी||

सचिन शिंदे
Thursday, 11 July 2019

हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत

हिरे माणिक, मोती आम्हा माती समान... संत तुकाराम महाराज यांचा अभंग जिवानातील लोभ वृत्तीला नाश करणारा ठरतो. त्याच वृत्तीने काही लोक वारीत सहभागी झाले आहेत. वारीत सहभागी होणाऱ्यांची सेवा करायची, शक्य तेवढ्या लोकांना सुविधा पुरवायच्या अशी कामे ते लोक करताना दिसतात. त्यात हडपसर येथील सत्संग प्रासादिक दिंडीतील शंकरराव मगर उर्फ आप्पा यांचे नाव अग्रस्थानी आहे.

आप्पा यांची 37 वी वारी आहे. वारीच्या अखंड काळात आप्पांनी दिंडीचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आनंदाने स्विकरली आहे. अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करताना आपण कोण आहोत, हेच विसरून आप्पांमधील सेवेकरी नेहमीच वारीच्या काळात जागृत असतो. आप्पा कोण याचा प्रश्न नक्कीच सगळ्यांच्या मनात आला असलेच. 

आप्पा म्हणजे पुण्याच्या मगर पट्टा सिटीतील सजग व्यक्तीमत्व. अफाट स्थावर व जंगम मालमत्ता असतानाही जमिनीवर राहणारी व्यक्ती. मोठी हाॅटेल्स, चाळीस एकरात चार हजार फ्लॅटसची स्किम, कन्स्ट्रक्शन क्षेत्रातही ज्यांना आदराने बोलावले जाते असेे आप्पा वारीच्या काळात मात्र दिंडीचे सेवेकरी म्हणून राहतात. घरात मर्सीडीज पासून मोठ्या चार ते पाच अलीशान कार आहेत.

मात्र त्या सगळ्याचा त्याग करून आप्पा वारीत ट्रकात बसलेले दिसतात. देहूपासून पंढरपूरपर्यंतच्या टप्प्यात दिंडीचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी आप्पांकडे असते. कडवी शिस्त, मधाळ वाणी, विलक्षण नम्रता अणि तितकीच माया मनात ठेवून दिंडीला कुटूंब मानणाऱ्या आप्पांमुळे दिंडी एकसंध उभी आहे. स्वतःकडे पद ठेवण्यापेक्षा हळू हळू ती पदे व जबाबदाऱ्या तरूणांकडे देण्याची वृत्ती आप्पांमध्ये परोपरीने वाढली आहे. 

आप्पा तीन दशकाहून अधिक काळ संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात येतात. सत्संग प्रासादीक दिंडीत ते असतात. त्या दिंडीचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. दिवसभर चालणाऱ्या वारकऱ्यांचे जेवण तयार करणे, त्यांच्यासाठी तंबू ठोकण्याचे नियोजन ते घेतात. दिंडीत पुरी, श्रीखंड, शिरा असे मिष्टान्नासह चविष्ठ भोजन देण्याचे नियोजन त्यांचे इतके परफेक्ट आहे की, दिंडीतील वारकरी दुसऱ्या दिवशी ऊर्जा घेवूनच चालतात. घरी वारीची पंरपरा कायम आहे.

घरात कोणीही जन्माला आले की, पाचवीला गळ्यात माळ असते. आप्पा यांचा व्यवसायाचा पसारा फार मोठ्ठा आहे. कोट्यावधीच्या  उलाढालीचा बिझनेस सांभाळून आप्पा वारीत सहभागी होतात. त्यावेळी त्यांना कशाचीही चिंता नसते. महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहाची सोय करणारी अख्ख्या सोहळ्यातील पहिली दिंडी म्हणून आप्पांच्या दिंडीचा उल्लेख होतो. महिलांना येणाऱ्या  अडचणी लक्षात घेवून तात्पुरत्या बंधीस्त स्नानगृहाची व्यवस्था आप्पा यांच्या पुढाकाराने झाली आहे. 

वारकरी म्हणून वावरणारे कोट्याधिश मनाचे आप्पांची सांपत्तिक स्थितीही तितकीच मोठी आहे. कोटीत व्यवहार करणारे सुखवस्तू कुटूंबातील आप्पा यांना सुरवातीच्या काळात अत्यंत कष्टप्रद जीवन जगावे लागले. त्यांच्या तरूणपणी तीनशे रुपयांचा सायकल घेताना त्यांना आर्थिक अडचणी आल्याचे ते बोलून दाखवतात.

कष्टाने काम केल्याने परमेश्वर प्रचंड देतो, ते घेता व टिकवता आले पाहिजे, असेही ते बोलून दाखवतात. आप्पा वारीत सहभागी होणाऱ्या शंभर एक लोकांच्या खर्चाची जबाबदारी घेतात. त्यांना घरी जाण्यासाठी पैसे देता. आप्पांचा वारीतील सहभाग म्हणजे संत नामदेव महाराज यांच्या अंहकाराचा वारा न लागो राजसा माझीया विष्णुदासां भाविकासी या अभंगाचीच आठवण करून देतो. वारीत सर्वाना समान प्रतिष्ठा देण्याची परंपरा कायम आहे, असेही यातून स्पष्ट होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News