मला याला गमवायचं नव्हतं...

अशोक इंगळे
Wednesday, 10 July 2019

मला सगळं कळत होतं. पण मला याला गमवायचं नव्हतं. प्रेम करायचे मी मनापासून. घरच्यांना तो नाही आवडायचा. कधीच लग्न लावून नसतं दिलं आमचं.

देवळात पळून जाऊन लग्न केलं आम्ही. माझ्या घरच्यांचा पहिल्यापासून लग्नाला विरोध. माझ्यावर लक्ष ठेवणं, सारखा मोबाईल चेक करणं.वैताग आला सगळ्याचा. तो खरच चांगला आहे हे समजावून समजावून राहिले पण कोणालाच पटलं नाही. उलट मला स्थळं बघायला सुरुवात केली. शेवटी आमचा नाईलाज झाला आणि पळून जायचं ठरवलं.देवळातले एक गुरुजी ओळखीचे होते. लग्न लावून द्यायला ते तयार झाले...

मुलाकडच्यांना काहीचं अडचण नव्हती. त्याचं घर खेड्यातलं. दिरानेदेखील मदत केली लग्नासाठी. माझ्या घरी कळालं आणि सगळा कालवा झाला. भावाने बोलणं सोडून दिलं. कित्येक दिवस आईवडीलही बोलत नव्हते, आता थोडे थोडे बोलतात. सगळ्या गावात त्यांची छी थू झाली. नातेवाइकांनी येऊन आईलाच दोष दिला. घरात मी लाडकी, असलं काही करेल यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पप्पांनीतर किती दिवस जेवणचं सोडलेलं. सगळ्यांनी मनवून मनवून त्यांना धीर दिला. भावाचे मित्र मला फोन करायचे. ताई तू चुकीचं केलं. असं पळून जायला नको होतं. घरच्यांची काय अवस्था झालीये माहितेय का तुला. तुझा भाऊ अक्षरशः रडला परवा...

मला सगळं कळत होतं. पण मला याला गमवायचं नव्हतं. प्रेम करायचे मी मनापासून. घरच्यांना तो नाही आवडायचा. कधीच लग्न लावून नसतं दिलं आमचं. लग्नाआधी तसा शरीरसबंध नव्हता आलेला आमच्यात. किस झालेली. एकदा फिरायला गेलेलो तेव्हा त्याने सेक्स करण्याचा प्रयत्न केलेला पण मी तयार नव्हते. लग्न झाल्यानंतर सतत संभोग व्हायचा. सकाळी मी लवकर उठायचे, सगळ्यांसाठी चहा करणं, मग जेवणाची तयारी. कपडे धूणं, लोकांच येणं जाणं घरात त्यामुळे सतत भांडी घासायला पडायची. घरात आमच्या सहा माणसं. सासू सासरे, दीर, नणंद आणि आम्ही दोघं. लग्न झाल्यापासून सासूबाईंनी कामातून पूर्ण हात काढून घेतला आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली...

आज वर्ष होत आलं लग्नाला. पोटात लेकरू आहे. आंधळ्या डोळ्याने पाहिलेली सगळी स्वप्नं खोटी ठरलीयेत. आपली बारा एकर शेती आहे, सिटीमध्ये दोन फ्ल्याट भाड्याने दिलेत, स्वतःचं दुकान काढायचंय, लवकरच गाडी घेऊ अशी दाखवेली सगळी स्वप्नं एक एक करून खोटी ठरली. गावातलं राहतं घर आणि अडीच एकर रान सोडलं तर काहीच नाही. त्यात दिराचं आणि नणंदेच लग्न डोक्यावर. होतं ते दुकान कर्जात बुडालं. नवरा आता कंपनीत कामाला जातो. आठ हजार पडतात महिन्याचे हातात. कमवणारं तोंड एक आणि खाणारी सहा. नटण्या थटण्याची माझी सगळी हौस मरून गेलीये.

आईवडिलांकडं कुठल्या तोंडाने जाऊ. एकदा आई आलेली भेटायला. जिद्दीने संसार कर म्हणाली. भाऊ तर अजूनही बोलत नाही. कुणासमोर मन हलकं करू कळत नाही. जरा काही घरात वाद झाले की नवरा हात उचलतो. उगाच लग्न केलं म्हणतो. तू आल्यापासून पणवती लागली. माझ्या डोळ्यात पाणी आलं तरी त्याला आता काही फरक पडत नाही. रात्री लगट करण्यापुरता जवळ ओढतो. प्रेम कुठं गेलं काही पत्ता नाही...

लग्न करून फसले मी. आयुष्याची वाट लागली. चूक झाली. पश्चाताप होतो, पण काय करणार. आता माघारी वाट नाही. एकदा पाउल उचललं आता मलाचं हे निभवावं लागणार. जे नशिबी आलंय ते भोगावं लागणार. सगळं तोडून जावं तर कुठं जाणार. आलेला दिवस ढकलायचा... पोटातल्या लेकरासाठी.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News