कोल्हापूरचं फेसबुकद्वारे हायप्रोफाईल ‘रॅकेट’

लुमाकांत नलवडे 
Monday, 21 October 2019
  • फोन कॉलवरून तरुणींकडून दम; तरुणांची आर्थिक फसवणूक, मानसिक त्रास

कोल्हापूर - फेसबुकच्या माध्यमातून हाय प्रोफाईल ‘रॅकेट’ सुरू झाले आहे. केवळ सजेशन (सुचविले जाते) दिले जाते. ते निवडल्यानंतर फोन कॉल सुरू होतात आणि लुटीचा व ब्लॅकमेलिंगचा प्रवास सुरू होतो. नऊशे-हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केले जाते आणि नंतर पाहिजे तिथे, पाहिजे ते पुरविण्याचे आमिष दाखविले जाते. मिळत काहीच नाही, मात्र यात आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास होतो. पुण्यात नोकरीसाठी असलेल्या आणि मूळच्या कोल्हापुरातील तरुणांची अशी फसवणूक झाली आहे.

एका तरुणाला आलेले ‘सजेशन’ त्याने स्वीकारले. त्यानंतर साडेनऊशे रुपये भरून त्याची नोंदणी झाली. त्यांना वेगवेगळे फोटो-व्हिडिओ पाठवून आमिषात अडकवले. पुढे मुलींचे त्यांना फोन येऊ लागले. पाच हजार रुपये, दहा हजार रुपये अकाऊंटवर देण्याची मागणी केली. तरुणाने सुरवातीला काही पैसे दिले; मात्र नंतर त्याने या मुलींचे कॉल टाळले. अखेर वारंवार फोन कॉल टाळण्यापेक्षा ‘माझे पैसे बुडाले समजा, मला पुन्हा फोन करू नका’ असे त्या तरुणाने सांगितले, तरीही मुलींचे कॉल येत आहेत. तुम्ही आणखी पैसे द्या, अन्यथा तुमची बदनामी केली जाईल, अस दम देण्यात आला. तुम्ही आमचे सदस्य झाला आहात. तुमच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरील सर्व फोटो, व्हिडिओ आम्ही ‘हॅक’ केले आहेत. ‘यू ट्यूब’वर तुमची बदनामी केली जाईल, असे सांगितले जाते.

‘‘एका तरुणाने तुम्ही माझी बदनामी करा, नाही तर अन्य काहीही करा, मी तुम्हाला आणखी पैसे देणार नाही’’ असे स्पष्ट  सांगितले. यावर त्यांनी आम्ही ‘डिपार्टमेंट’ला तुमची माहिती देतो. तुम्हाला पोलिस ठाण्यात बोलवतो. मुलींची विचारणा करीत होता, म्हणून बदनामी करतो, असाही दम दिला जातो. काही तरुण या भीतीने पैसे वारंवार देत आहेत. एका तरुणाला आपण फसल्याची जाणीव झाल्यावर त्याने या रॅकेटची माहिती घेतली. त्यांचा संवाद रेकॉर्डिंग केला आहे. तुमची माहिती आम्ही सायबर सेलला देणार असल्याचे सांगितले. तरीही त्या तरुणीने पुन्हा त्या तरुणाला दम देऊन सायबर सेलवाले तुमच्याकडे पाठवतो, असे सांगितले.

सायबर सेलचे हत्यार...
ज्या सायबर सेलकडे सोशल मीडियासंदर्भातील गुन्हे दाखल होतात, त्याच सायबर सेलकडे तुमची तक्रार देणार, असे सांगितले जाते. सायबर सेलचे लोक तुमच्या घरी पाठवणार इथंपर्यंत दम दिला जात असल्याचे सांगण्यात येते. सायबर सेलने याची शहानिशा करून वेळीच हा प्रकार रोखला नाही, तर अनेक तरुणांना मंदीच्या काळात आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

व्हॉटस्‌ ॲप बिझनसेचा वापर? अनेक तरुणींकडून ‘व्हॉटस्‌ ॲप’ कॉल होत आहेत. शक्‍यतो त्याचे रेकॉर्डिंग तयार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून ही फसवणूक होते, असेही तरुणांकडून
सांगण्यात येते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News