‘सुपर ३०’ : सामान्य कुटुंबातील मुलाची असामान्य कहाणी

संतोष भिंगार्डे
Saturday, 13 July 2019

अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटात आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘क्वीन’ तसेच ‘चिल्लर पार्टी’ हे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या विकास बहल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. एका गरीब-सामान्य कुटुंबातील मुलाची असामान्य अशी ही कहाणी आहे. 

तब्बल दोन-अडीच वर्षांनी हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट आला आहे. बिहारमधील ब्रिलियंट शिक्षक आनंद कुमार यांच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम आनंद कुमार करीत असतात. याच आनंद कुमार यांच्या त्यागाची, कष्टाची आणि त्यांच्या अपार परिश्रमाची कहाणी या चित्रपटात मांडण्यात आली आहे. ही कहाणी स्फूर्तिदायक आणि प्रेरणादायी अशीच आहे.

अभिनेता हृतिक रोशनने या चित्रपटात आनंद कुमार यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘क्वीन’ तसेच ‘चिल्लर पार्टी’ हे चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या विकास बहल यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. एका गरीब-सामान्य कुटुंबातील मुलाची असामान्य अशी ही कहाणी आहे. 

आनंद कुमार (हृतिक रोशन) यांचा जन्म बिहारमधील पटना येथील एका गरीब कुटुंबात होतो. त्यांचे वडील पोस्टमनचे काम करीत असतात. आनंद लहानपणापासूनच हुशार आणि तल्लख बुद्धी असलेला विद्यार्थी. केम्ब्रिज विद्यापीठात शिक्षण घ्यावे, असे त्याचे स्वप्न असते. दरम्यान, त्याला केम्ब्रिज विद्यापीठामध्ये बोलावले जाते. परंतु अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमुळे तो तेथे जाऊ शकत नाही आणि त्याचे हे स्वप्न अपूर्ण राहते. दरम्यान, त्याच्या वडिलांचा मृत्य होतो आणि त्याच्यावर घराची जबाबदारी पडते. या वेळी दारोदार हिंडून आनंद पापड विकू लागतो आणि घर सांभाळण्याचा प्रयत्न करतो.

अचानक त्याला त्याच्या आधीच्या बॅचमधील टॉपर विद्यार्थी भेटतो व त्याची हुशारी पाहून तो त्याच्या नावाने आयआयटी कोचिंग क्‍लासेस सुरू करतो. साहजिकच कोचिंग क्‍लासेसमुळे आनंद कुमार यांच्या घरची परिस्थिती कमालीची सुधारते. मात्र आपण कुठेतरी चुकतोय, अशी खंत त्याला वाटू लागते. शिक्षणाचा चाललेला बाजार त्याला आवडत नाही. त्याला त्याची खंत वाटते.

याच वेळी त्याच्या वडिलांचे ‘अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वो बनेगा जो हकदार होगा’ हे वाक्‍य त्याच्या पुढील जीवनाला कलाटणी देणारे ठरते. मग कथानक एक वेगळेच वळण घेते. पैशाच्या मागे न धावता समाजातील गरीब मुलांमध्ये आपले ज्ञान वाटून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी काम करतो. मग या संपूर्ण प्रवासात त्यांना कोणत्या आणि कशा अडचणी येतात... त्यांच्या भावाची कशी मदत होते... वगैरे गोष्टींसाठी हा चित्रपट पाहावा लागेल. त्यातूनच या चित्रपटाचे नाव ‘सुपर ३०’ का? या प्रश्‍नाचे उत्तरही गवसेल.

आनंद कुमार यांची भूमिका हृतिक रोशनने समरसून साकारली आहे. या भूमिकेवर त्याने कमालीची मेहनत घेतली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूर, पंकज त्रिपाठी, नंदीश सिंह या कलाकारांनी आपापल्या भूमिका चोख वठविल्या आहेत. बिहारी भाषेचा तडका या चित्रपटाला आहे आणि तो लहेजा बरोबर पकडण्यात कलाकार यशस्वी झाले आहेत. दिग्दर्शक विकास बहल यांनी आनंद कुमार यांच्या जीवनातील विविध पैलू उत्तमरीत्या पडद्यावर मांडलेले आहेत. 

आज समाजात आर्थिकदृष्ट्या मागासलेले कित्येक हुशार विद्यार्थी आहेत. घरच्या गरिबीमुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत किंवा त्यांची प्रगती होऊ शकत नाही. अशा मुलांना आनंद कुमार यांच्यासारखा गुरू लाभला तर ते मोठी झेप घेऊ शकतात, हे या चित्रपटावरून सिद्ध होते. अजय-अतुल यांचे संगीत या चित्रपटाला आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम झाली आहे. चित्रपटाची लांबी काहीशी खटकणारी आहे. बाकी चित्रपट उत्तम आहे. आनंद कुमार यांच्या कठोर संघर्षाची ही प्रेरणादायी गोष्ट आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News