कशी आहे तुमच्या मुलांची संगत?

शिवराज गोर्ले, प्रेरक साहित्य लेखक
Wednesday, 3 July 2019

फक्त मैत्री एकमेकांसाठी हिताची, आनंदाची ठरतेय ना इकडं लक्ष द्यावं. दोघं मिळून छान गप्पा मारत असतील, खेळत असतील, एकमेकांना अभ्यासातही मदत करत असतील, नवं काही शिकत असतील, करत असतील, बरं नसताना परस्परांची काळजी घेत असतील, तर आणखी काय हवं?

मुलांची संगत ही एक पालकांच्या दृष्टीनं नाजूक बाब असते. वाईट संगतीनं मुलं बिघडू शकतात, यात शंका नाही. पालकांच्या सर्व संस्कारावर बोळा फिरवण्याचं काम वाईट संगत करू शकते. त्यामुळं मुलं कुठल्या संगतीत आहेत, याकडं लक्ष द्यायलाच हवं. पण त्यातही संयम आणि थोडी चतुराई दाखवावी लागते. एकतर निश्‍चित, मुलांचे मित्र हे पालकांनी निवडायचे नसतात. त्यांची ती निवडत असतात. त्यात आपल्या ‘आवडी-निवडी’चा प्रश्‍न येत नाही, येऊ देऊ नये.

फक्त मैत्री एकमेकांसाठी हिताची, आनंदाची ठरतेय ना इकडं लक्ष द्यावं. दोघं मिळून छान गप्पा मारत असतील, खेळत असतील, एकमेकांना अभ्यासातही मदत करत असतील, नवं काही शिकत असतील, करत असतील, बरं नसताना परस्परांची काळजी घेत असतील, तर आणखी काय हवं?

मित्र निवडत असताना मुलं स्वतःसारखेच निवडतील, असं सांगता येत नाही. तसा पालकांचा आग्रहही असू नये. वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या, स्वभावाच्या मुलांशी मैत्री ही परस्परांना पूरक ठरू शकते. पण शेवटी निवड ही त्यांनाच करायची असते. मात्र, अशी मैत्री एकतर्फी नसावी. तुमचा मुलगा अबोल, हळवा, शांत असल्यास मित्र फार ‘दादागिरी’ करत नाहीय ना, एवढं पाहावं. मित्रांना एकमेकांकडून घेण्यासारखं, एकमेकांना देण्यासारखं खूप काही असतं याचं पालकांनी भान ठेवायला हवं. ‘तू फक्त हुशार मुलांशी मैत्री करत जा,’ हा सल्ला चांगला वाटला तरी योग्य नव्हेच.

हुशारी ही फक्त शैक्षणिक प्रगतीवर ठरत नसते आणि तेवढीच असेल तर पुरत नसते. एखाद्या मित्राचं गणित चांगलं असेल तर आपल्या मुलानं त्याच्याकडून गणित शिकावं, ही अपेक्षा योग्यच आहे. पण त्या मित्रालाही आपल्या मुलांकडून काय शिकता येईल याचा विचार करावा. ‘त्याच्याकडून आपल्याला हवं ते मिळालं की झालं,’ ही शिकवण मुलाला संधिसाधूपणा शिकवणारी आहे. अभ्यासासाठी मित्रांची मदत होत असेल तर उत्तमच; पण तेवढाच मैत्रीचा हेतू नसतो. निरपेक्ष, निखळ मैत्रीसुद्धा मुलांची खूप मोठी गरज असते. 

अगदी क्वचित काही मुलं मित्राचा वापर करणारी, लबाड वागणारी असू शकतात. फक्त मित्राच्याच डब्यातलं खाणं, त्याला काही न देणं, स्वतःचा अभ्यास झाल्यावर मित्राचा होऊ नये म्हणून त्याला खेळायला बोलावणं इ. या संदर्भात मुलाला थोडं सावध करावं. संगतीमुळं मुलाची भाषा, वागणं नको ते ‘वळण’ घेत नाहीयेना इकडे ही लक्ष असावं. मात्र, मुलं मित्रांच्या बाबतीत खूप हळवी, संवेदनशील असतात. त्यामुळं हे सारं त्यांना न दुखावता कौशल्यानं करावं लागतं. मुलाला मित्रांचे काही भले-बुरे अनुभव येऊ शकतात, हे जाणून पालकांनीही अशा वेळी ‘मोठ्या मित्रा’ची भूमिका निभावायला हवी.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News