"काय हो,किती मार्क्स पडले चिरंजीवाला?"

शंभूराज पाटील
Saturday, 15 June 2019

मी अशीच बरीच उदाहरणे पाहिली की १ ली ते ४ थी मुलांना इंग्रजी आणि नंतर मुलाला काहीच येत नाही इंग्रजी सोडून म्हणून पुन्हा मराठी माध्यमच्या शाळेत प्रवेश घेतला जातो.

 "काय हो,किती मार्क्स पडले चिरंजीवाला?आणि काय ठरवलय पुढे?"..
         निकाल लागला की हमखास हे दोन प्रश्न ऐकायला मिळतात.यातील पहिला प्रश्न एवढा महत्वाचा नसला तरी दुसरा प्रश्न म्हणावं एवढा नक्कीच सोप्पा नाही.यावर सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे.पुढे काय करायचं यावर   शिक्षक विद्यार्थी त्याचे पालक आणि पुढील शैक्षणिक संस्था या सगळ्यांचीच खऱ्या अर्थाने परीक्षा असते.
       आतापर्यंत मी पाहिलेल्या गोष्टीमध्ये आपण मुले लहान असताना इंग्लिशच्या  मोहापायी मोठ्या इंग्रजी शाळेत घालतो.आणि पुढील ४ थी पर्यंतच शिक्षण फुकट मिळत असताना विकत घेतो आणि छाती फुगवून गावातून फिरतो की माझी पोर इंग्रजी शाळेत आहेत.पण घरातील वातावरण संपूर्ण मराठी असल्यामुळे ज्या वयात मुलांचा पाया भक्कम करायचा असतो नेमक्या त्याच वयात धड इंग्रजी पण नाही आणि मराठी पण नाही अश्या वडाच्या पारंब्यासारख अधांतरी लोंकळत ठेवतात आणि मग जेव्हा मुलगा ५वी ला जातो तेव्हा आपण मुलाला काहीच येत नाही म्हणून एकतर शाळेला दोष देतो नाहीतर मुलाला.
       मी अशीच बरीच उदाहरणे पाहिली की १ ली ते ४ थी मुलांना इंग्रजी आणि नंतर मुलाला काहीच येत नाही इंग्रजी सोडून म्हणून पुन्हा मराठी माध्यमच्या शाळेत प्रवेश घेतला जातो. त्यांची मुख्य तक्रार एक होती ती म्हणजे पालक बोलायचे की सगळे शाळेतील शिक्षक इंग्लिशमध्ये बोलायचे आणि आम्ही मराठी मग पालकांचा आणि शिक्षकांचा संवाद होतच नव्हता त्यामुळे नक्की मुलाला काय कमी - जास्त आहे ते समजत नव्हते. हा त्यांचा मुद्दा खरंच विचार करण्यासारखा होता.मुलाच्या शैक्षणिक रथाची शिक्षक आणि पालक हे दोन मुख्य चाक असतात. दोघांनी समान चालले तर मुलाचा विकासाचा रथ योग्य गतीने आणि योग्य मार्गावर धावतो.पण आपल्या इकडे या पालक आणि शिक्षकांचा संवाद हा..त्या मास्तरला काय कळतं इथून सुरु होतो ते आई - बापाने घरात हेच शिकवले का इथपर्यंत संपतो,ही एक शोकांकिता...
       मुलांचा पायाच जर असा डळमळीत असेल तर भविष्य काय असेल मग?..८वी पर्यंत सहज पास होतात मुले. ९वी ला गेल्यावर समजते मुलाला लिहिता - वाचता येत नाही.तेव्हा मग माध्यमिक शिक्षक प्राथमिक शिक्षकांना दोष देवून आपल्या मुलाला ९वी मध्ये गेला तरी लिहिता येत नाही म्हणून तक्रार घेवून गेलेला पालक हताश होवुन मुलालाच दोष देवून माघार घेतो.यात खरा दोष पालकांचा आहे अस वाटत. शिक्षकांवर सगळी जबाबदारी न सोपवता योग्य वेळी मुलांच्या आभ्यासात लक्ष घातले असते तर आज अश्या वेळा आल्या नसत्या.यानंतर खरी गम्मत येते ती १०वीच्या निकालानंतर..निकाल लागला रे लागला की मुलांच्यातील चित्रकार,खेळाडू,लेखक, शास्त्रज्ञ, गायक,वादक,आणि अश्या बऱ्याच भविष्यात देशाला जगात सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या पात्रांचा मिळालेल्या मार्क्स मुले आर्ट्स,कॉमर्स, सायन्स च्या अतिरेकी हव्यासापायी सरळ सरळ खून केला जातोय. मला जर ९०% मिळाली आणि माझा आवाज चांगला आहे तर माझा पुढील प्रवास हा कोणा गायकाच्या घरी नसेल तर सायन्स, अभियंता शिकवणाऱ्या एखाद्या मोठ्या कॉलेज मध्ये खूप पैसे घालून पाठीवर अपेक्षाच ओझ घेवून चालू होतो.जर मला ४०% पडले आणि मला नाचता चांगलं येत असेल तर माझा प्रवास डान्स स्कूल मध्ये नसून आर्ट्स नाहीतर आय टी आय सारख्या कमी मार्कस पडलेल्या मुलांसाठी हक्काची जागा म्हणून बदनाम झालेल्या या जागी चालू होतो.कलेला आपल्या देशात प्राधान्य नाहीच पण जिथे असेल तिथे खूप कमी प्रमाणात आहे.
       इंजिनियरिंग साठी प्रवेश मिळावा म्हणून कर्ज काढून प्रवेश घेणारा पालक त्याच मुलाला एखाद्या कलेत पुढे चांगलं शिक्षण मिळावं म्हणून एवढं कष्ट कधीच घेताना दिसत नाही. खर सांगायचं तर पालकांना आपल्या मुलांवर हा विश्वासच नाही की आपली मुले सचिन,लता मंगेशकर,राकेश शर्मा, नरेंद्र मोदी, ए. पी.जे.अब्दुल कलाम.असे काहीतरी महान व्यक्ती बनतील असा.त्यांच्या अपेक्षा फक्त एवढ्याच की मुलाला सुरक्षित नोकरी मिळावी आणि त्याने सुखाने आयुष्य जगावे.पण तुमच्या मुलामध्ये जर सगळ्या जगाला सुखात ठेवण्याची कला असेल तर तुम्ही का त्याला संकुचित विचारसरणीचे बनवत असता?..५०% च्या आतील कला,७०% च्या आतील वाणिज्य आणि ७०% पुढे शास्त्र ही गटबाजी कोणी तयारी केली मला अजून समजले नाही. ५०% वाला गैरमारगे लायकी नसताना वशिला लावून शास्त्र शाखेत गेला की मोठ्या अभिमानाने फिरता आणि तिथेच जर ९०% वाला त्याला कलेमध्ये काहीतरी करायचं आहे म्हणून जर त्याने कला शाखेत प्रवेश घेतला की तो मूर्खपणा ठरतो.सरळ सरळ त्या मुलाला काही कळत नाही.अस ठरवून सगळे त्याला नावे ठेवतात. किती विरोधाभास आहे आपल्या शिक्षणात आणि विचारात..
       आजकाल एक गोष्ट सातत्याने नजरेत येते ती म्हणजे मुलांची १०वी मधील मार्क्स आणि १२ मधील मार्क्स यातील तफावत.१० वी मध्ये ९० पेक्षा जास्त असलेलं आणि इतरही जास्त गुणांनी पास झालेली मुले १२वी मध्ये खूप कमी येतात.मग या मुलांना खरेच हुशार बोलायचं की त्यांचा शाखा निवडीचा निर्णय चुकलं बोलायचं की ठरल्याप्रमाणे यांनी अभ्यासच केला नाही हा सगळीकडे सोयीस्कर चिटकणारे स्टिकर चिटकवायचे.
       सगळ्याच लोकांना या गोष्टी लागू होत नाही पण बहुतांश लोकांत वरील मानसिकता अजूनही आहे.काही मोजक्या शैक्षणिक शाखा सोडल्या तर नोकरी व भविष्य सुखकर करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहते.हाताला चव असणारा एक चांगला आचारी बनू शकतो.चांगला बोलणारा कीर्तनकार नाहीतर व्याख्याता बनू शकतो. सिनेमाचं वेड असणारे दिग्दर्शक बनू शकतात.फोटो काढणार चांगला फोटोग्राफर बनू शकतो. एखादा चांगला शेतकरी बनू शकतो.मी तर म्हणेन अश्या प्रकारची खूप ठिकाणं आहेत जिथे स्पर्धा कमी आहे आणि यशस्वी होण्याचे शक्यता जास्त..बाकी कष्ट काय सगळीकडे घ्यावे  आहे.
       शेवटी एवढेच सांगेन की..पालकांनी हुशार बनून शिक्षणाच्या या बाजारात आपल्या मुलाची खरी किंमत कोठे आहे हे ओळखता कोठेही विकू नका.कारण एखादा खराब कागद एका अधिकाऱ्यासमोर असला तरी त्याला खूप मोठी किंमत असते  आणि एखाद्या कोरा कागद वडापावच्या गाड्या वर असला तरी त्याला काहीच किंमत नसते.असेच आपला मुलगा कोणत्या ठिकाणी योग्य आहे हे ओळखून त्याला योग्य ठिकाणी ठेवा..आणि आभिमानाने सांगा सर्वांना.माझा मुलगा या गोष्टीत चांगला आहे मी त्याला तेच बनवणार.."
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News