विद्यावेतनासाठी कितीदा आंदोलन करायचे

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Monday, 1 April 2019

मागील दीड वर्षापासून सुरक्षेचा प्रश्‍न दुय्यम बनला असून, विद्यावेतनाचा प्रश्‍न जटिल झाला आहे.

नागपूर -  महिना, दोन महिने, चार महिने लोटले की, राज्यात निवासी डॉक्‍टर संप किंवा सामूहिक रजा आंदोलन पुकारतात. दोन महिन्यांपासून विद्यावेतन न मिळाल्याने निवासी डॉक्‍टर संप पुकारण्याच्या पवित्र्यात आहेत. विद्यावेतन न मिळाल्यास ११ एप्रिलपासून आंदोलन करण्याचा अल्टिमेटम निवासी डॉक्‍टरांनी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना दिला. 

निवासी डॉक्‍टर २४ तास कर्तव्यावर दिसतात. त्यांचे नेहमीचे आंदोलन सुरक्षेच्या प्रश्‍नावर असते. मात्र, मागील दीड वर्षापासून सुरक्षेचा प्रश्‍न दुय्यम बनला असून, विद्यावेतनाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. दरमहा १० तारखेला विद्यावेतन मिळते. 

मात्र, मागील विद्यावेतन न मिळाल्याने आम्ही उपाशीपोटी उपचार करायचे का, असा प्रश्‍न डॉक्‍टर विचारत आहेत. मेडिकलमध्ये सुमारे साडेपाचशे ते सहाशेवर निवासी डॉक्‍टर आहेत. त्यांच्या विद्यावेतनावर दरमहा २ कोटी ८० लाखांचा निधी खर्च होतो. मागील वर्षी मेडिकलच्या ‘पीएलए’ फंडातून विद्यावेतन अदा करण्याची वेळ मेडिकलवर आली. राज्य शासन  विद्यावेतनाचा निधी मेडिकलला नियमित देत नसल्याने दर महिन्याच्या १० तारखेला निवासी डॉक्‍टरांच्या विद्यावेतनाचा प्रश्‍न उभा ठाकतो.

 मेडिकलसह राज्यातील चार ते पाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यावेतनाचा प्रश्‍न आहे. वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडून विद्यावेतनाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे निवासी डॉक्‍टर आंदोलनाचा पवित्रा घेतात, असे मार्डचे प्रतिनिधी डॉ. आशुतोष जाधव यांनी सांगितले. अधिष्ठात्यांनी शिष्टमंडळाला येत्या १० एप्रिलपर्यंत विद्यावेतन उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News