अभ्यासक्रमाशिवाय कसे शिकणार अभियांत्रिकी?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019
  • एक ऑगस्टपासून प्रथम वर्षाची सुरुवात; विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्‍यता

नागपूर - अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेशप्रक्रियेत पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे १ ऑगस्टपासून महाविद्यालयात नियमित वर्ग सुरू होणार आहेत. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आवश्‍यक असलेल्या नव्या अभ्यासक्रमाला मान्यता मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांना काय शिकवायचे? असा प्रश्‍न महाविद्यालयातील प्राध्यापकांना पडला आहे.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेद्वारे दीड वर्षापूर्वी विद्यापीठाला अद्ययावत अभ्यासक्रम पाठविण्यात आला. विद्यापीठात अभ्यासमंडळ अस्तित्वात नसल्याने या अभ्यासक्रमात बदल  करता आला नाही. विद्यापीठात अभ्यासमंडळाची निर्मिती होऊन जवळपास नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी झाला. यादरम्यान अभियांत्रिकी शाखेतील विविध विषयांच्या अभ्यासमंडळात यावर चर्चा करून नव्या अभ्यासक्रमाची निर्मिती करणे आवश्‍यक होते. मात्र, जून महिन्यात शिक्षण मंचाचे प्राचार्य डॉ. एस. आर. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करण्यात आली. त्यानंतर समितीने कामास सुरुवात करीत, अभ्यासक्रम तयार केला. मात्र, त्यात विविध ‘स्कीम’चा उल्लेख नसल्याचे कारण देत, अभ्यासमंडळातील इतर सदस्यांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे अभ्यासक्रम तयार करीत असताना, त्यात उद्योगातील अनुभवी व्यक्‍तींचाही सहभाग नोंदविणे आवश्‍यक होते. तसे काहीच झाले नसल्याचे समजते.

ऐन प्रवेशाच्या काळात समितीने चार ते  पाच महाविद्यालयात केलेल्या कार्यशाळेला प्राध्यापकांचा अल्प प्रतिसाद लाभला. दुसरीकडे एकाच वेळी चारही वर्षांचा अभ्यासक्रम तयार करून तो संकेतस्थळावर टाकणे गरजेचे असते. मात्र, समितीकडून केवळ एकाच वर्षाच्या अभ्यासक्रमाची माहिती देण्यात येत आहे. उर्वरित अभ्यासक्रम कसा आहे, हे कळत नाही. त्यामुळे असा अभ्यासक्रम लावण्याची विद्यापीठाला का घाई झाली, हे कळत नाही.

आठवड्यात तयारी करायची कशी?
दोन महिन्यांत थातूरमातूर अभ्यासक्रम करून समितीद्वारे तो प्रथम वर्षाला लावण्याची तयारी दर्शविली आहे. यासाठी शाखा आणि विद्वत परिषदेला बगल देत, समिती कुलगुरूंचा विशेषाधिकारात मान्यता मिळविण्याच्या तयारीत आहे. दुसरीकडे इतक्‍या कमी वेळात महाविद्यालयात संबंधित विषयांची पुस्तके आणायची कशी?, नव्या विषयाचे प्रशिक्षण नसताना, ते शिकवायचे कसे? हा प्रश्‍नही प्राध्यापकांसमोर आहे.

विशेष म्हणजे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी बराच कमी वेळ मिळतो. अशावेळी अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असे अनेक प्रश्‍न आहेत. शिवाय विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार आहे.

अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाविषयी कुलगुरू डॉ. सि. प. काणे यांना विचारणा केली असता, त्यांनी अभ्यासक्रमाला विशेषाधिकार वापरून मान्यता देण्यात येईल. मात्र, अभ्यासक्रम तयार नसल्यास एआयसीटीईचा अभ्यासक्रम जसाचा तसा लावण्याचा विचार करता येईल. मात्र, एआयसीटीईकडून मान्यता नसल्यास अभ्यासक्रम पुढल्या वर्षीपासून लावण्यावर विचार होईल, असे सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News