कोचिंग क्लासेस संचालकांचे वरातीमागून घोडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • कोचिंग क्लासेस संचालकांवर अग्नीशमन विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला. 
  • अग्नी सुरक्षा नसलेले कोचिंग क्लासेस सील करण्याची कारवाई सुरू होताच झोपेचे सोंग घेतलेल्या कोचिंग क्लासेस संचालकांना जाग आली आहे. 
  • क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत दहा जूनपासून कठोर कारवाई सुरू केली आहे.

अकोलाः विद्यार्थी घडविण्याचे व्रत घेतल्याचे सांगत त्याच विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या कोचिंग क्लासेस संचालकांवर अग्नीशमन विभागाने कडक कारवाईचा बडगा उगारला. अग्नी सुरक्षा नसलेले कोचिंग क्लासेस सील करण्याची कारवाई सुरू होताच झोपेचे सोंग घेतलेल्या कोचिंग क्लासेस संचालकांना जाग आली आहे. कारवाईचा धसका घेत शहरातील २७ कोचिंग क्लासेस संचालकांनी अग्नी सुरक्षा यंत्रणा उभी केली असल्याचा अनुपालन अहवाल सादर करून वरातीमागून घोडे हाकणे सुरू केले आहे. 

सुरत येथील कोचिंग क्लासच्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत दहा जूनपासून कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये कोचिंग क्लासेसच्या इमारती सील केल्या जात असल्याने भीतीपोटी कोचिंग क्लासेस संचालकांची पळापळ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील अनेक कोचिंग क्लासेस निव्वळ कमाईच्या मागे लागले असून, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे. 

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुचनेचे पालन न करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या इमारती सील करण्यात येत आहेत. याची धास्ती घेऊन ५१ कोचिंग क्लासेसपैकी शुक्रवारपर्यंत २७ कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्नीशमन विभागाकडे अनुपालन अहवाल सादर करून सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर सूचना देऊनही उपाय योजना न करणाऱ्या सरस्वती कोचिंग क्लास आणि युनिक कोचिंग क्लासेस अद्यापही सील असल्याची माहिती अग्नीशमन विभागाने दिली आहे. 

अशी आहे सध्याची स्थिती 
शहरातील ५१ कोचिंग क्लासेसपैकी २७ कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी अग्नीशमन विभागाकडे अनुपालन अहवाल सादर करून अग्नी सुरक्षेचे काम सुरू केले आहे. तर १३ वसतिगृहांपैकी पाच वसतीगृह संचालकांनी अनुपालन अहवाल दिला असून, अद्यापही आठ वसतिगृहांमध्ये अग्नी सुरक्षेच्या उपाय योजना करण्यात आल्या नसल्याची माहिती अाहे. 

अल्टीमेटमनंतर करण्यात आलेल्या कारवाईचे फलित दिसून येत आहे. २७ जणांनी कामे सुरू केले असून, उर्वरित कोचिंग क्लासेसवर कारवाई सुरूच राहणार आहे. 
-रमेश ठाकरे, अग्निशमन अधिकारी, अकोला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News