बीडमध्ये बळीराजाला मदतीचा हात, उद्या होणार बियाणांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 June 2019
  • यंदा मराठवाड्यात भयानक दुष्काळ पडला आहे. पाण्यासाठी मानस रानोमाळ भटकंती करत आहेत.
  • शासनाने गुरांकरिता चारा छावणी उभी केली आहे. या चारा छावण्यातील शेतकऱ्यांना समाजिक जबाबदारीतून बीड जिल्ह्यातील त्रिमुर्ती मंगल कार्यालय, वडवणी येथे मोफत बियाणे वाटप  करण्यात येणार आहेत.

बीड : दुष्काळाने होरपळलेल्या बळीराजाला माझगाव डॉक शिप बिल्डर्स प्रा. लि. कंपनीने मदतीचा हात दिला. सीएसआर फंडातून बीड जिल्ह्यातील माजलगांव येथे गुरांच्या चारा छावण्यातील शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे यांच्या पुढाकाराने 23 जून रोजी सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदा मराठवाड्यात भयानक दुष्काळ पडला आहे. पाण्यासाठी माणसं रानोमाळ भटकंती करत आहेत. पशुना पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी चारा उपलब्ध नाही. शासनाने गुरांकरिता चारा छावणी उभी केली आहे. या चारा छावण्यातील शेतकऱ्यांना समाजिक जबाबदारीतून बीड जिल्ह्यातील त्रिमुर्ती मंगल कार्यालय, वडवणी येथे मोफत बियाणे वाटप करण्यात येणार आहे.

यावेळी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, आदर्श ग्राम योजना कार्याध्यक्ष पोपटराव पवार, माझगाव डॉक शिप बिल्डर्स प्रा. लि. अध्यक्ष कमोडोर राकेश आनंद, संचालक कमोडोर टी. व्ही. थॉमस, माजी आमदार केशवराव आंधळे, आमदार आर. टी. देशमुख, जि.प. अध्यक्ष सौ. सविताताई गोल्हार, नगराध्यक्षा सौ. मंगलाताई मुंडे, राजकुमार लोढा, राजेश सोनार, रमेश आडसकर उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संखेने उपस्थित रहावे असे आवाहन अरुण राऊत, बंडु खांडेकर, भगीरथ बियाणी, बाबरी मुंडे, हरी पवार, विष्णु नेमाटे, उत्तरेश्वर खताळ यांनी केले आहे.

बळीराजा तू दुष्काळापुढे हतबल आहेस परंतु लाचार नाहीस 
"माझा बीड जिल्हा कायम दुष्काळग्रस्त, या वर्षी सारखा भयानक दुष्काळ जन्मपासून प्रथमच पहायला मिळाला. गतवर्षी पावसाअभावी खरिपाचे पीक हातचे गेले तर रब्बीची पेरणीच झाली नाही. पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष की तीन- चार किलोमीटर वरून पाणी आणावे लागत आहे. जिथे माणसाचे जगणे मुश्किल तिथे, जनावराचे हाल विचारायलाच नको. 

सरकारने पशुधन वाचविण्याकरिता गुरांच्या छावण्या सुरू केल्या आहेत. याची भीषण दाहकता तब्बल ६२२ गुरांच्या छावण्या आणि तळहाताचा फोडाप्रमाणे जपलेल्या गुरा ढोराकरीता माझ्या जिल्ह्यातील तब्बल १ लाख ५० हजारापेक्षा जास्त शेतकरी आज छावण्यातच राहतोय. खरतर त्यांनी ही जनावरे कधीच विकली असती परंतू त्याच इमान आणि प्रेम हे आडव येत. 

गेल्यावर्षी पीके हातची गेली म्हणून कर्जे तशीच डोक्यावर आहेत. केंव्हाही पाऊस पडू शकतो अशावेळेस काळ्या आईची ओटी कशी भरायची. परंतू पेरणी तर करावीच लागेल पण बियाणे आणायचे कोठून आणि हयावर्षी बॅंकेचे कर्ज मिळणे मुश्किल आहे. मी तसा शेतकरी नाही परंतु बायको शेतकरी कुटुंबातील आहे. मला शेतकरी बांधवाना दिलासा द्यायचा होताच. 

उन्हाळयात ४६ डिग्री सेल्सियस तापमानात छावण्याना भेट दिली. मला प्रत्येक छावण्यात काही वयोवृध्द माणसे भेटली ज्यानी १९७२ च्या दुष्काळाच्या आठवणी सांगीतल्या. माझी मुले मोठी झाल्यावरती मला २०१९ च्या दुष्काळाची दाहकता विचारतील परंतु मी हतबल नसेल सांगेन अभिमानाने की “समुद्राच्या वादळाने लाखो मासे बाहेर पडली असतील तरी, मला या हातांनी हजारो समुद्रात सोडतां आली आणि प्राण वाचवता आली” होय तब्बल ५००० शेतकरी बांधवाना अजित १९९ हे बीटी बियाणे १० हजार बॅग वाटप करणार आहोत.

बळीराजा तुला सलाम कारण तू पिकवतो म्हणूनच तूला जगाचा पोशींदा म्हणतात. मला माहीतय तू दुष्काळापुढे हतबल आहेस परंतु लाचार नाहीस त्याकारणानी तर तू गळफास लावून घेतोस. परंतु तू आता जगलाचं पाहीजेस कारण जिथे माणसे आई वडीलाना सांभाळणे दुरापास्त, तिथं तू मात्र पोटच्या पोराप्रमाणे जनावरावंर जीव लावतोयस...। बळीराजा आम्ही आपली वाट पाहतोय ह्या बियाण वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने..."         
- ओमप्रकाश स. शेटे, शिल्पा ओमप्रकाश शेटे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News