पूरग्रस्तांसाठी ग्रामसेवक संघटनेचा मदतीचा हात

मंगेश शेवाळकर
Monday, 12 August 2019
  • ग्रामसेवक संघटना सरसावली असून संघटनेने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला 
  • सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला लवकरच जमा केली जाणार

हिंगोली: कोल्हापूर भागातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी हिंगोली जिल्हा ग्रामसेवक संघटना सरसावली असून संघटनेने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे साडेपाच लाख रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला लवकरच जमा केली जाणार आहे.

राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या काळात हिंगोली जिल्हा ग्रामसेवक संघटनेने मदतीचा हात पुढे केला आहे. यापूर्वीही संघटनेने नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये आर्थिक मदत दिली आहे. कोल्हापूर व परिसरातील भागांमध्ये पुरामुळे लाखो नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या नागरिकांना मदत करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. 

संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पांढरे पाटील, सचिव राजेश किलचे, मंचक भोसले, देवराव इंगोले, शेख शैनोदीन, पी. बी. काटकर, ज्ञानेश्वर गोड्डावार, भगवान झरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील ३५७ ग्रामसेवकांचे एक दिवसाचे वेतन सुमारे साडेपाच लाख रुपये जमा होणार आहे. सदर रक्कम लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये जमा केली जाणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. पांढरे पाटील यांनी सांगितले. 

याशिवाय वस्तू स्वरुपात मदत देण्यासाठीही संघटनेने पुढाकार घेतला असून यासंदर्भात मंगळवारी (ता.१३) ग्रामसेवक भवन येथे सर्व ग्रामसेवक यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या इच्छेनुसार वस्तू स्वरूपात मदत गोळा केली जाणार आहे. यावेळी जमा होणाऱ्या वस्तुची मदत देखील कोल्हापूर कडे रवाना केली जाणार असल्याची सांगण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News