सोलापुरात पोलिसांच्या डोक्‍यावर हेल्मेट!

परशुराम कोकणे
Tuesday, 9 July 2019
  • स्मार्ट सिटी सोलापुरात हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण फक्त 20 ते 25
  • हेल्मेट सक्ती करण्याआधी शहर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शासकीय सेवकांनी हेल्मेट वापरण्यास सुरवात करावी

सोलापूर : स्मार्ट सिटी सोलापुरात हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांचे प्रमाण फक्त 20 ते 25 इतके आहे. सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढावे यासाठी नवे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हे सकारात्मक आहेत. हेल्मेट सक्ती करण्याआधी शहर पोलिस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आणि शासकीय सेवकांनी हेल्मेट वापरण्यास सुरवात करावी यासाठी आयुक्‍त शिंदे यांनी आदेश दिले आहेत. 

सोलापूरचा पदभार घेतल्यानंतर आयुक्त शिंदे हे हैदराबाद आणि लंडन येथील प्रशिक्षणासाठी गेले होते. गेल्या आठवड्यात ते प्रशिक्षणाहून परत आले असून त्यांनी सर्व पोलिस ठाण्यांसह विविध विभागाच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आयुक्त शिंदे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक चांगली करण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या आहेत. तसेच शहरात हेल्मेटबाबत प्रबोधन आणि कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

सोलापूरकरांना हेल्मेटची सक्ती, कारवाई करण्याआधी प्रत्येक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि शासकीय सेवकाने डोक्‍यावर हेल्मेट परिधान केले पाहिजे ही भूमिका आयुक्त शिंदे यांनी घेतली असून यासाठी प्रत्येक विभागाला वाहतूक नियंत्रण शाखेने पत्र देण्याचे आदेश दिले त्यांनी आहेत.

"सोलापुरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या अनुषंगाने पोलिस दल प्रयत्नशील आहे. यासाठी महापालिका प्रशासनासह सोलापूरकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. अपघाती मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे आवश्‍यक आहे. आम्ही सर्व पोलिस आणि शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट घालण्याच्या सूचना देत आहेत. केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रत्येकाला हेल्मेट वापरावे लागेल. वाट पाहून कारवाईचा निर्णय घेण्यात येईल."
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News