हे पावसाळ्यातले खेळ खेळलात का?

जयश्री दाणी
Tuesday, 2 July 2019
  • वारा पाऊस आला की दारासमोर वाहणाऱ्या पाण्यात कागदाच्या छोट्या छोट्या होड्या सोडल्या जाई .
  • तेव्हा आपणच कुठेतरी दूर उधळणाऱ्या समुद्रातून ओली भटकंती करून आल्यासारखे वाटे .

आता लहान मुलांजवळ किती सुंदर सुंदर रंगीत खेळणी असतात... बॉक्स बॉक्स रचून बनणारी लाल पिवळी घरे, कर्रकन किल्ली फिरवल्यावर धावणाऱ्या मोटारी, बसेस, ट्रेन. पाठीतली कळ दाबल्यावर टाळ्या पिटणारा विदूषक. टिव्हीवरील खेळाडूंच्या हातात असतात तशा महागड्या रॅकेट, पांढरे शुभ्र शटल.

आकाशातील ग्रहमालिकेतील ग्रहांसारखे हे ssss टपोरे, कलिंगडासारखे गरगरीत भले मोठ्ठे बॉल. ते ही पायाने खेळायचे वेगळे, हाताने खेळायचे वेगळे, टप्पे मारायचे वेगळे.. अबब केव्हढी ही जादूई दुनिया  आपल्या लहानपणी मात्र उड्या मारायला दोरी म्हणून सुद्धा घरचीच कुठलीतरी रस्सी दिल्या जाई. एक जाडजूड काठी आणि छोट्या कमचीची गिल्ली बनवत असू. खपरेल, विटांची तुकडे लगोऱ्या होत.

मोठ्यांच्या मेहरबानीने बॉल मिळाला तर उत्तमच अन्यथा दगडाला कापडात गुंडाळून व्यवस्थित चेंडू बनवल्या जाई. खडूने जमिनीवर डब्बे काढून चॉकलेट- लिमलेट खेळत असू. एखाद्या कोपऱ्यात दोन चार कवड्या सापडल्यात की सोन्याच्या मोहरा हाती लागल्यासारखे तब्येतीने खूष होत जिथे जागा मिळेल तिथे चम्मा - अष्टा, सोंगट्या खेळत असू. शहरी बॅटमिंटन, टेनिसही खेळायचा आनंद आम्ही लुटत असू. वहीचा जाडा पुठ्ठा म्हणजे बॅट आणि कागदाचा घट्ट गोळा म्हणजे फूल शिवाय विषामृत, लपाछपी, आंधळी कोशिंबीर, पकडापकडी, साखळी, धाबाधुबी, रेष्टीप 
हे खेळही होते सोबतीला आणि आम्ही यात जाम खूष होतो. 

नाही म्हणायला उन्हाळा आला की खट्याळ जोकर आणि देखणी बदाम राणी असलेला पत्त्यांचा एक जोड आणि सरसर सरपटणारे साप व त्याला टाळणाऱ्या शिड्या असलेला सापशिडीचा बोर्ड मिळे . सापशिडी मागेच ल्युडो आणि कधीकधी सावकार गेम असे . वारा पाऊस आला की दारासमोर वाहणाऱ्या पाण्यात कागदाच्या छोट्या छोट्या होड्या सोडल्या जाई. तेव्हा आपणच कुठेतरी दूर उधळणाऱ्या समुद्रातून ओली भटकंती करून आल्यासारखे वाटे.

गावातल्या निळ्याभोर आकाशात क्वचितच दिसणारी आपली विमानेही कागदाचीच. ती झुई sss झप्प ssss उडल्यावर होणारा आनंद अवर्णनीयच शिटी सुध्दा वाजवायची ते दोन बोटे तोंडात खोचून. काही खुफिया गुपित पहायची दुर्बीण म्हणजे अंगठा आणि त्या जवळील बोटाचे डोळ्यासमोर धरलेले रिंगण  मज्जा मज्जा यायची आपल्याही लहानपणी काही रंगीत खेळणी नसताना !
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News