हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला

श्रीपाद यशवंत
Friday, 26 July 2019
  • एखाद्या व्यक्तीशी आपलं काहीच नातं नसतं पण हृदयाच्या आत कुठे तरी एक जागा असते त्याच्या साठी आणि अशाच व्यक्ती भेटत राहतात.

सकाळच्या पारी "हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला" असे गात भल्या पहाटे म्हणजेच रामप्रहरी येणारा हा देवदूतच म्हणा हवं तर देवाची गाणी म्हणत दान मागणारा आणि लोकांना उठवणारा काळ बदलला तसा हा ही बदलला. आत्ताच्या पिढीला किती कळेल माहित नाही. खेडेगावात तो लवकरच यायचा पण शहरात त्याची वेळ थोडी उशिराचीच असायची. आमच्या कडेही एक वासुदेव नियमित यायचा गाणं म्हणून दान मागायचा आजी आजोबा गेलेल्या व्यक्तीचे नाव विचारून त्याच्या नाव घेत दान पावलं असं म्हणत आशीर्वाद द्यायचा. मला कळत नव्हते तेव्हा मी चुकून स्वतःचे नाव सांगायचो आईने सांगितल्यावर कळले की, आजोबांचे नाव सांगायचे असते.

कधी जास्तीची अपेक्षा नाही एखाद दोन रुपय, वाटीभर तांदूळ-गहू काय द्याल ते पण समाधानी, खूप वर्ष आमच्या घरी येत असे खास करून एकादशीला आला तर हमखास घरात चहा घेऊन जायचा. जस जसं वय होत गेलं तो ही थकायला लागला. पण आमच्या कडे आला की त्याचं दानाचा (धान्याचं ) गाठोडं ठेवून मग पुढे जायचा दिनक्रम संपला की नेत असे. आई वडील गेल्यावर सुद्धा नियमित यायचा त्यांच्या विषयी बोलायचा बहिणींची चौकशी करायचा. पूर्वी मला आशीर्वाद द्यायचा आता माझ्या मुलांना देतो घर बदलल्या मुळे वर्षभरात भेट नाही.

आज नवीन ठिकाणी असाच एक वासुदेव आला होता त्यात तुमचा फोटो पण पहिला जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लवकरच पुन्हा पहिल्या घरी राहायला जात आहोत त्याचं दर्शन होईल अशी आशा करतो. सकाळच्या पारी हरिनाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला हा लेख जयश्री यांच्या पोस्ट वर लिहिला आणि आज योगायोग बघा जी व्यक्ती हयात आहे का नाही हे सुद्धा माहित नाही ती व्यक्ती पुन्हा भेटते मी तरी याला त्या श्रीहरीची कृपा म्हणेल.

एखाद्या व्यक्तीशी आपलं काहीच नातं नसतं पण हृदयाच्या आत कुठे तरी एक जागा असते त्याच्यासाठी आणि अशाच व्यक्ती भेटत राहतात. काल वाक्य पूर्ण आठवत नव्हत आज त्यांनी ऐकवले वाड वडिलांच्या नावानं, यशवंत बाबाच्या नावानं, दान उजव्या हातानं, दान पाची बोटानं, आशीर्वाद बाळाला साऱ्या कुटुंबाला वासुदेव देईन, देव कल्याण करीन. ते भेटले डोक्यावर हात ठेवला आशीर्वाद दिला सोबत चहा घेतला. आता नाही फिरणं होत पाय दुखतात, तुझा झाला ना पिऊन लाग बाळा कामाला एवढाच संवाद काल वाढदिवस झाला आज पासून नवीन सुरवात आई वडील भेटल्या सारखं वाटलं दिवसाची सुरुवात मस्त झाली

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News