मिश्किल आठवण

काव्यसुमन
Friday, 19 July 2019

मे महिन्यात एकदा मी प्रवास करत असताना बसमध्ये अधल्यामधल्या एका स्टॉपवर नवीनच लग्न झालेली मुलगी चढली.

मे मध्ये लग्न सराई असल्याने रोज नवनवीन नवऱ्या पहायला मिळतात. एक वेगळं सलज्जतेचं सौंदर्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतं. मे महिन्यात एकदा मी प्रवास करत असताना बसमध्ये अधल्यामधल्या एका स्टॉपवर नवीनच लग्न झालेली मुलगी चढली. मी बसलेल्या सीटवर जागा रिकामी असल्याने ती माझ्या कडेला बसली.

तीचा नवरा मात्र एकदम पाठीमागे सीट पूर्ण रिकामी असल्याने पाठी जाऊन बसला. त्या मुली सोबत तीची एक माहेरची कोणीतरी नातेवाईक होती. ती त्या मुलीला पाठीमागे नवऱ्यासोबत बसण्याचा आग्रह करत होती आणि ती मुलगी अगदी गोड लाजत नको राहूदे असं म्हणत होती. नंतर त्या नवऱ्याने खुणेने त्या महिलेला बायकोला पाठीमागे पाठवा असं सांगितलं. तीने तो निरोप तीला दिला अन् मग ती मुलगी लाजत लाजत त्याच्याजवळ जाऊन बसली.
 
मला ती मुलगी खूप आवडली. नाकी डोळी नीटस, गोरीपान, अगदी नाजूक खूप सुंदर बाहुली सारखी होती. तीच्या पुढे तीचा नवरा मात्र एकदम सावळा उंचपुरा आणि धिप्पाड होता. हे सर्व सांगण्याचा हेतू हा की या प्रसंगावरून मला माझ्या मुलीच्या लहानपणीचा एक मिश्किल प्रसंग आठवला.

आमच्या गावातल्या एका शिक्षकांच्या मुलाचं लग्न होतं मी माझे मिस्टर आणि आमची मुलगी (मुलगी ५/६ वर्षाची होती) आम्ही त्या लग्नाला मुलाच्या बाजूने गेलो होतो. आहेर देवून जेवायला जाण्याची सगळ्यांची गडबड चालू होती. म्हणून आम्ही सावकाश आहेर देवून मग जेवायला जायचं ठरवलं. गर्दी कमी झाल्यावर ह्यांनी आमच्या मुलीच्या हातात आहेराचं पाकिट दिलं आणि सांगितलं की,"हे पाकिट तू आपल्या दत्ता काकाला दे".

मुलगी त्या नवरा नवरी जवळ गेली . क्षणभर त्या दोघांकडे पाहात उभी राहिली आणि नंतर तीने नवरीकडे प्रेझेंट पाकीट दिलं. आम्ही दोघं हॉलमध्ये खुर्चीत बसून हे सर्व पहात होतो. आम्हाला दोघांना आश्चर्य वाटलं. ती ज्या काकाला चांगलं ओळखते त्याला प्रेझेंट न देता तीने त्या अनोळखी नवरीकडे कसं काय दिलं? ती परत जेव्हा आमच्यापाशी आली तेव्हा आम्ही तिला काही विचारण्यापूर्वीच ती म्हणाली,"मला काकापेक्षा काकी (काकू) जास्त आवडली म्हणून तुम्ही काकाला द्यायला दिलेलं पाकीट मी काकीला (काकूला) दिलं. आम्ही दोघं विस्मितच झालो आणि खूप हसलो ही.

त्यानंतर ह्यांनी तो प्रसंग त्यांच्या घरी गेले असता सर्वांना सांगितला. सर्वांनाच हसू आले. आजही त्या प्रसंगावरून सर्वजण तीला चिडवतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News