HAPPY BIRHTDAY GARY SOBARS बॅटिंग, बॉलिंग, फिल्डींग, स्पीनर, फास्टरमधला सगळ्यांचा अजूनपर्यंतचा बाप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 28 July 2019

गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी झाला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनला जन्मलेले सोबर्स हे युटीलीटी क्रिकेटर्सच्या परंपरेचे संस्थापक होत.

क्रिकेटच्या इतिहासातील आद्य आणि आजवरचे सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ज्यांचे स्थान वादातीत आहे, अशा गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी झाला. बार्बाडोसमधील ब्रिजटाऊनला जन्मलेले सोबर्स हे युटीलीटी क्रिकेटर्सच्या परंपरेचे संस्थापक होत. त्यांनी डॉन ब्रॅडमन यांची शाबासकी कमावली. एका डावात एका फलंदाजाने 365 धावा काढणे आणि एका फलंदाजाने एका षटकात सहा षटकार खेचणे असे त्यावेळी अशक्यप्राय वाटणारे आणि आजही चकित करणारे पराक्रम त्यांनी केले.

फाईव्ह-इन-वन क्रिकेटपटू
सोबर्स यांच्याकडे तब्बल पाच प्रकारची कौशल्य होती. फलंदाज-क्षेत्ररक्षक-स्पीन-मनगटाच्या जोरावर स्पीन आणि जलद-मध्यमगती मारा अशा पाच प्रकारची कौशल्य त्यांना अवगत होती. प्रामुख्याने विकेटजवळ किंवा कुठेही ते चपळाईने क्षेत्ररक्षण करायचे. 

365 धावांची इनिंग
सोबर्स यांनी कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक धडाक्यात साजरे केले. पाकिस्तानविरुद्ध किंगस्टनमधील सबीना पार्कवर त्यांनी 365 धावांची खेळी केली. त्यांनी लेन हटनचा 1938 मधील 264 धावांचा उच्चांक एका धावेने मोडला. पुढे सोबर्स यांचा उच्चांक 1994 पर्यंत अबाधित राहिला. 

त्या इनिंगचे वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे पहिलेवहिले शतक होते. त्याआधी त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती 80. दहा तास 14 मिनिटांच्या खेळीत त्यांनी आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदविले. 27 फेब्रुवारी 1958 रोजी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ते 20 धावांवर नाबाद होते. तिसऱ्या दिवसअखेर 28 फेब्रुवारी रोजी त्यांनी 228 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर 1 मार्च रोजी त्यांनी हटनचा उच्चांक मोडल्यानंतर विंडीजचा डाव घोषित करण्यात आला. 38 चौकारांसह त्यांनी नाबाद 365 धावांची खेळी केली. 

एका षटकात सहा षटकार
31 ऑगस्ट 1968 रोजी सोबर्स यांनी इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत नॉर्दम्प्टनशायरचे प्रतिनिधीत्व करताना स्वान्सीमध्ये ग्लॅमॉर्गनविरुद्ध एका षटकात सहा षटकार खेचले. प्रथमेणी क्रिकेटमध्ये असा पराक्रम केलेले ते पहिले फलंदाज ठरले. डावखुरा वेगवान गोलंदाज माल्कम नॅश हा दुर्दैवी गोलंदाज ठरला. अनुक्रमे डिप मिड-विकेट, डीप स्क्वेअर-लेग, स्ट्रेट, डीप फाईन-लेग, लाँग-ऑफ व डीप स्क्वेअर-लेग अशा ठिकाणी त्यांनी षटकार खेचले. त्यावेळी ते 76 धावांवर नाबाद राहिले. पाचव्या चेंडूवर रॉजर डेव्हिसने झेल पकडूनही तोल गेल्याने सीमारेषा ओलांली आणि षटकार मिळाला होता.

सोबर्स यांच्या कारकिर्दीचे आकडे थक्क करणारे आहेत. त्यांच्यावेळी क्रमवारीची पद्धत नव्हती. नंतर विस्डेनने ती लागू केली. त्यावेळी सोबर्स यांना तब्बल आठ वेळा मोसमातील सर्वोत्तम क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला होता. अशा सोबर्स यांच्याच नावाने हा पुरस्कार आज दिला जातो, जो त्यांचा नव्हे तर क्रिकेट खेळाचाच सन्मान होय.

दृष्टिक्षेपात कारकिर्द (कालावधी 1954-74)
कसोटी : 93
डाव : 160
नाबाद : 21
धावा : 8032
सर्वोच्च : नाबाद 365
सरासरी : 57.58
शतके : 26
अर्धशतके : 30
शून्य : 12

गोलंदाजी
चेंडू : 21599
धावा : 7999
विकेट : 235
सरासरी : 34.03
इकॉनॉमी रेट : 2.22
स्ट्राईक रेट : 91.9
डावात 5 विकेट : 6

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News