दिव्यांगांवर मात केलेली यशस्विनी

गजेंद्र बडे
Saturday, 26 January 2019

राज्य पुरस्कार विजेती, ए वर्ल्ड स्कूल ग्लोबल युथ ऍम्बेसिडर, नेहरू युवा केंद्राची प्रवक्ती, अनेक पुरस्कारांची विजेची दीक्षा दिंडे..! दीक्षानं इतकं काय केलंय? दीक्षानं समाजाला स्वतःपेक्षा मोठं मानलंय. स्वतःच्या अपंगावर रडत न बसता आनंदानं जगण्याचा मार्ग निवडलाय. करिअर म्हणून ती तिच्या आयुष्यात यशस्वी आहेच, पण माणूस म्हणून ती त्यापेक्षाही अधिक उंचीवर आहे.  आधाराची गरज आहे असं वाटावं, अशी दीक्षा आता अनेकांचा आधार बनली आहे.

राज्य पुरस्कार विजेती, ए वर्ल्ड स्कूल ग्लोबल युथ ऍम्बेसिडर, नेहरू युवा केंद्राची प्रवक्ती, अनेक पुरस्कारांची विजेची दीक्षा दिंडे..! दीक्षानं इतकं काय केलंय? दीक्षानं समाजाला स्वतःपेक्षा मोठं मानलंय. स्वतःच्या अपंगावर रडत न बसता आनंदानं जगण्याचा मार्ग निवडलाय. करिअर म्हणून ती तिच्या आयुष्यात यशस्वी आहेच, पण माणूस म्हणून ती त्यापेक्षाही अधिक उंचीवर आहे.  आधाराची गरज आहे असं वाटावं, अशी दीक्षा आता अनेकांचा आधार बनली आहे.

महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार मिळवलेल्या दीक्षाच्या कामाबद्दल ऐकलं होतं. प्रत्यक्षात तिला भेटणं हा एक वेगळाच आनंद आहे. ती झोपडपट्टीतल्या मुलांना शिकवते. तेथील महिलांना मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेबद्दल शिक्षण देते. स्वतःचे दुःख बाजूला ठेवून मार्ग काढायला शिकवते. शारीरिक अपंगत्वाला न गोंजारत राहता, त्याचं दुःखी होऊन बाऊ न करता दीक्षाच सामाजिक काम सुुरू आहे. बी.कॉम. झाल्यानंतर आता दीक्षा एम.ए. करते आहे. त्याच्या बरोबरीनं तिचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचाही अभ्यास सुरू आहे. तिला कलेक्‍टर व्हायचंय. कारण त्या पदावरून

समाजासाठी खूप काम करता येईल हा विश्‍वास तिच्या मनात आहे. ती नेहरू युवा केंद्राची प्रवक्ती असल्याने, या माध्यमातून ती विविध ठिकाणी व्याख्यानांना जाते. मित्र-मैत्रिणींबरोबर झोपडपट्टीतल्या मुलांसाठी शाळा चालवते. इतकी धावपळ व पळापळ करणारी दीक्षा पायाने अपंग आहे, हे सांगून पटणार नाही. ती जन्मतःच जवळजवळ ८४ टक्के अपंग आहे. लहानपणापासून अपंगत्वामुळे  खूप काही तिने सोसलं आहे. शाळेचं वय झालं, मात्र कोणी शाळेत घेईनात. शेवटी महापालिकेच्या एका शाळेत तिला प्रवेश मिळाला. आई तिला सायकलच्या कॅरेजवर बसवायची आणि सायकल ढकलत तिला शाळेपर्यंत घेऊन जायची.

ती शाळा सातवीपर्यंतच होती. पुन्हा नव्या ऍडमिशनची समस्या पुढे आली. अखेर मांगडेवाडीत एक उल्हास शिक्षण संस्था आहे, त्यांनी आधीचं शालेय रेकॉर्ड बघून शाळेत प्रवेश देण्याचं मान्य केलं. कात्रजच्या जुन्या घाटाकडे ती शाळा आहे. आता आईला तिथपर्यंत तिला सोडायला यावं लागायचं. सायकलवरून तिथं जाणं शक्‍य नव्हतं. मग आई दुचाकी शिकली. तिनं गाडी घेतली. ती नंतर दिक्षाला गाडीवरून सोडू लागली. गाडीवरून जाताना ती तिला आणि दिक्षाला ओढणी किंवा मोठ्या कपड्याने बांधायची. ती शाळा दहावीपर्यंत असल्यानं पुढच्या शिक्षणाचा प्रश्‍न दीक्षासमोर पुन्हा उभा राहिला.

मात्र तिची शैक्षणिक प्रगती बघून आता शाळा तिला ऍडमिशन द्यायला तयार होत होत्या. कात्रजला घराजवळ हुजूरपागा शाळेत तिला अकरावीसाठी प्रवेश मिळाला. तिथं ज्युनिअर कॉलेज उपलब्ध होतं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पुन्हा प्रश्‍न. पुण्यातल्या हुजूरपागा कॉलेजने तिला प्रवेश दिला. दीक्षाच्या आयुष्यात एक प्रसंग आला. गणपती उत्सवादरम्यान तिच्या घराजवळील मंडळात काही अनाथ मुलं आली होती. दीक्षा त्या मुलांशी बोलली. त्यातली एक मुलगी थोडी निराश दिसत होती. तुम्हा मुलांसाठी मी कलेक्‍टर होऊन काम करेन, असं दीक्षा त्या मुलीला समजावत होती. त्यानंतरच्या वर्षी गणपती उत्सवात पुन्हा मुलं आली. ती मुलगी आवर्जून दीक्षाला भेटली आणि म्हणाली, 'ताई, तू कलेक्‍टर झालीस का?' यातून तिला समाजासाठी काम करण्यास प्रोत्साहन मिळाले आणि त्यातूनच तिने पुण्यातल्या झेड ब्रीज या पुलाखाली एक शाळा सुरू केली.

सर्वसामान्य शाळेपेक्षा अर्थातच ही वेगळी शाळा. सिग्नलला थांबणारी मुलं किंवा झोपडपट्टीत राहणारी त्यांच्यासारखीच मुलं या शाळेत शिकतात. वरवर बघता वाटेल या मुलांना शिकवण्यात एवढं काय मोठसं? पण या शाळेचे किस्से ऐकले की सावित्रीबाई फुलेंनी उभी केलेल्या शाळेची वर्णन आठवतात. दीक्षा आणि तिचे मित्र-मैत्रिणी ही शाळा चालवतात. हेच काम थोडं मोठ्या स्वरूपात करता येईल का, या विचाराने पेटलेल्या दीक्षा आणि तिच्या मित्र-मैत्रिणींनी 'रोशनी' नावाची सामाजिक संस्था स्थापन केली.

अनेक अनुभवांची शिदोरी मिळवत दीक्षाचं आयुष्य आज यशाच्या मार्गावर आहे. आयुष्यात चांगली माणसं मिळणं, हेच तीच आयुष्य आहे. स्वतःचे अनुभव सांगून अनेकांना जगण्याची उमेद देते. स्वतःच्या आनंदी जगण्यातून इतरांना आनंदी राहण्याचे बळ देते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News