हातोडा, छन्नीने एटीएम फोडले अन् रिकाम्या हाताने परतले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • सुरक्षा रक्षकाला चाकू दाखवला; कुंभार वेशीतील घटना 

सोलापूर: सुरक्षा रक्षकाला पकडून चाकुचा धाव दाखवून कोपऱ्यातल्या खोलीत डांबले. हातोडी आणि छन्नीने मारून एटीएम सेंटरमधील एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. धडपड करूनही यश येत नसल्याने दोघा चोरट्यांनी पळ काढला. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास कुंभार वेस परिसरातील आयसीआयसीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडली. 

सुरक्षा रक्षक घनश्‍याम राजन भोसले (वय 24, रा. म्हाडा कॉलनी अष्टविनायक नगर, जनता बॅंकेच्या शेजारी, जुळे सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. कुंभारवेस येथील आयसीआयसी बॅंकेच्या एटीएममध्ये घनश्‍याम भोसले हे ड्युटीवर होते. 

पाऊस येत असल्याने एटीएम सेंटरचे शटर अर्धवट बंद करून भोसले हे आतमध्ये मोबाईलवर चित्रपट पाहत होते. दोन अनोळखी व्यक्ती रविवारी पहाटे दीडच्या सुमारास एटीएम सेंटरमध्ये घुसले. तोंडावर मास्क लावलेल्या तरुणाने हातातला चाकू भोसले यांच्या गळ्याला लावला. तेरेसे कुछ लेना देना नही, आवाज किया तो खल्लास कर देंगे असे म्हणून धाक दाखवून कोपऱ्यातला खोलीत बसविले.

तोंडावर रुमाल बांधलेल्या तरुणाने हातोडा व छन्नीने मशीन फोडले. कॅश डोअर उघडता आले नाही. धडपड करूनही रोकड निघाली नाही, शेवटी दोघेही बाहेर थांबलेल्या तिसऱ्या साथीदारासह पळून गेले. बाहेर पडल्यानंतर दोघांनी कन्नड भाषेत संवाद साधल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घाबरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षक भोसले यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक देवदत्त गोडसे तपास करीत आहेत. 

आयसीआयसीआय बॅंकेकडून एटीएम मशीनला असलेल्या कॅमेऱ्यातून चित्रीकरण मिळण्याची शक्‍यता आहे. पोलिसांनी याप्रकरणातील चोरट्यांच्या शोधाला वेग दिला आहे. 
- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News