अकरावीचे निम्मे प्रवेशही होईनात; दहावीच्या निकालात टक्का घसरल्याचा परिणाम 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • यंदा दहावीचा निकाल कमालीचा घटला आहे. निकाल घोषित होऊन एक महिना झाला तरी ग्रामीण भागातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमतेच्या निम्मेदेखील प्रवेश झालेले नाहीत.

औरंगाबाद - यंदा दहावीचा निकाल कमालीचा घटला आहे. निकाल घोषित होऊन एक महिना झाला तरी ग्रामीण भागातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमतेच्या निम्मेदेखील प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची चिंता वाढली आहे. दहावीच्या परीक्षेत यंदा भाषा व सामाजिकशास्त्र या विषयाचे अंतर्गत गुण रद्द केल्यामुळे बोर्डाच्या निकालात कमालीची घट झाली आहे. 

त्यातही प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. शाळेला जोडून असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एका तुकडीत ६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असते, तर वरिष्ठ महाविद्यालयांना जोडून असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एका तुकडीत ८० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असते. 

तालुक्‍यांमध्ये अनेक कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी दहावीचा निकाल घोषित झाल्यापासून प्रवेश देण्यास सुरवात केली आहे. परंतु, बोर्डाकडून गुणपत्रिका मिळेपर्यंत बहुतांश विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले नाहीत.

गुणपत्रिका मिळाल्यानंतर फारच कमी विद्यार्थी प्रवेशासाठी महाविद्यालयात जात आहेत. अनेक विद्यार्थी आयटीआयमध्ये आपला प्रवेश निश्‍चित होतो का, याच्या प्रतीक्षेत आहेत. तर काही विद्यार्थी जिल्ह्यातील महाविद्यालयात अकरावी ऑनलाइन प्रवेशात अडकले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कोणत्याच कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश पूर्ण झालेले नसून, अनेक जागा रिक्त आहेत. जर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही तर शिक्षक अतिरिक्त ठरतील, तुकडी जाईल याची चिंता शिक्षकांसह संस्थाचालकांना देखील लागली आहे. यावर्षी विज्ञान, कला, वाणिज्य अशा सर्वच अभ्यासक्रमांच्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News