हादगा  

समाधान भोरे 
Monday, 28 January 2019

दोन- चार कुत्री उगाचच भुंकत व्हती. बुरुजावर पारव घुमत व्हत. भर दुपारी पाटलाचा पडका वाडा स्मशान शांत पडला व्हता. भरभर सुटलेला वारा रानातून गावाकडं सरला. कावदान रानातून गावात शिरलं. म्हतारीचं लुगडं उडून गेलं. तारकाठीही कोलमडली. मघाशीच जिवून वाळू घातलेल्या जरमलचं पातेलं वाऱ्यानं पडलं. त्याचा तो खण खण आवाज म्हतारीचं काळीज चिरत गेला आणि आता हादग्याची पिवळीशार फुलं म्हतारीच्या पांढऱ्या शुभ्र देहावर पडू लागली. 

दोन- चार कुत्री उगाचच भुंकत व्हती. बुरुजावर पारव घुमत व्हत. भर दुपारी पाटलाचा पडका वाडा स्मशान शांत पडला व्हता. भरभर सुटलेला वारा रानातून गावाकडं सरला. कावदान रानातून गावात शिरलं. म्हतारीचं लुगडं उडून गेलं. तारकाठीही कोलमडली. मघाशीच जिवून वाळू घातलेल्या जरमलचं पातेलं वाऱ्यानं पडलं. त्याचा तो खण खण आवाज म्हतारीचं काळीज चिरत गेला आणि आता हादग्याची पिवळीशार फुलं म्हतारीच्या पांढऱ्या शुभ्र देहावर पडू लागली. 

भर दुपारची येळ व्हती, उन्हाचा चराटा वाढला व्हता. उन्हानी म्हातारीच्या जिवाची लाहीलाही झाली. तिची तगमग वाढत व्हती. बाळू लोंढ्याची म्हातारी बरडत- खरडत घराबाहेर पडली. घराबाहेर हादग्याच्या झाडाची सावली भुईवर रेंगाळत व्हती, म्हातारीचं लुगडं म्हातारीनं तारकाठीवर वाळू घातलं व्हत. चिमण्या झाडावर बसून चिमणघास खात व्हत्या. घराशेजारच्या मुंजुबाच्या देवळात मुंजुबा दुपारीची ईश्रांती घेत पडला व्हता. री जिवून- खावून हादग्याच्या इसायाला बसली. बघता बघता म्हातारी डुलकी घेऊ लागली. आदलिंगा "मध्या' दुपारीच शेरडं घेऊन घरला निघाला. गावतली लोक सकाळीच रानात गेली व्हती. महादेवाच्या मठात बळी नाना चटई टाकून आडवं झालं. गजा च्या किरणा दुकानासमोर लिंबाच्या झाडाखाली म्हताऱ्या एकामेकींच्या सुनांची उणी-दुणी काढत व्हत्या. हादग्याच्या झाडाखाली म्हातारी हा..हा.. म्हणता गाढ झोपली. म्हातारीच्या नवार लुगड्याचा डुईवर घेतलेला पदर वाऱ्याबरबर पझरत व्हता. म्हतारीची सावली हळूहळू वर्तमानातून भूतकाळाकडं पसरत गेली. 

नवीनच लगीन होऊन म्हातारी कारभारी लोंढ्याच्या घरी गृहलक्ष्मी म्हणून आली व्हती. हिरवा शालू, सोनेरी बांगड्या, ते साजर रूप, सोबतच चाफ्याच्या फुलांच्या मुंडवळ्याचा दरवळणारा सुगंध आणि मोहरून जाणारी नवरी, चाफ्याचा सुवास आज अंतरंगात कुठंतरी लपलेला. आज पुन्हा नव्यानं तिला जाणवला. गोरापान नाकशार, शेलाटी कारभारीचं रूप बघून ती मनातल्या मनात लाजली. हळूहळू अंधाराचा परिघ काळानुसार विस्तारत गेला. तिच्या संसाराचा मांडव फुलत गेला. एक ल्योक, एक लेक, तिच्या कुशीत हळूहळू वाढत व्हतं, सार सुख देवानं तिच्या पदरी बांधलं. पोर मोठी झाली. लेकीच लगीन होऊन ती सासरी गेली. पोरगं थोडाफार शिकून मुंबईला हमालीत गेलं. पोरांची लग्न झाली. त्यांना पोरंबाळ झाली. म्हातारा- म्हातारीच्या खांद्यावर नातवंड खेळू लागली. दर उन्हाळ सुटीला ती येऊ लागली. मग म्हातारा- म्हातारी हुरळून जायची. शाळा भरली की म्हातारा- म्हतारीच्या डोळ्यांत आसवांचा पूर व्हायचा. गावाकडं म्हातारा- म्हातारी दोघंच राहायची. म्हातारं एका रात्री जेवलं अन्‌ झोपलं. सकाळी उठलंच नाही, ते कायमचंच. बिचारी म्हातारी एकटीच राहिली. दगडधोंड्यांच्या सायीला.

 लेक बोलवून कटाळली, पण म्हातारी काय बधली नाही. ती गावकडंच राहिली. ढासळलेल्या बुरुजासारखी म्हातारीच्या पायांचं दुखणं वाढत गेलं. आता म्हातारीची साथ व्हती फक्त आठवणीपुरती. वारा वाहू लागला पिकलेल्या पिवळ्या पानांचा सडा भुईवर पसरला. भरभर सुटलेला वारा रानातून गावाकडं सरला. कावदान रानातून गावात शिरलं. म्हातारीचं लुगडं उडून गेलं. तारकाठीही कोलमडली. मघाशीच जिवून वाळू घातलेल्या जरमलचं पातेलं वाऱ्यानं पडलं. त्याचा तो खण खण आवाज म्हातारीचं काळीज चिरत गेला आणि आता हादग्याची पिवळीशार फुलं म्हातारीच्या पांढऱ्या शुभ्र देहावर पडू लागली. मघाशी बुरुजावर घुमणारं पारवं एकाएकी स्तब्ध झालं आणि आता फक्‍त हादग्याच्या झाडाची सळसळ ऐकू येऊ लागली आणि म्हातारीचा पांढरा देह हादग्याच्या पिवळ्या फुलात मिसळून गेला...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News