मला घडवणारे गुरुवर्य

प्रा. डाॅ. मारोती कसाब
Wednesday, 19 June 2019

एकोणिसशे एकोन्नवदच्या जून महिन्यात मॅट्रिक उत्तीर्ण होऊन मी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी सेलूच्या नूतन महाविद्यालयात दाखल झालो. सेलू शहर हे माझ्या गावापासून दीडदोन कोसावर असलेलं छोटंसं पण टुमदार शहर.

एकोणिसशे एकोन्नवदच्या जून महिन्यात मॅट्रिक उत्तीर्ण होऊन मी अकरावीत प्रवेश घेण्यासाठी सेलूच्या नूतन महाविद्यालयात दाखल झालो. सेलू शहर हे माझ्या गावापासून दीडदोन कोसावर असलेलं छोटंसं पण टुमदार शहर.

दलितमित्र श्रीरामजी भांगडिया हे नगराध्यक्ष असताना या शहराची भरभराट झालेली. सर्वत्र पक्क्या सिमेंटच्या सडका. रस्त्यावर दुतर्फा झाडी. सर्वत्र सुनियोजित घरं. विरळ शांत वस्त्या. लिबर्टी आणि फेरोज या सिनेमाच्या दोन टाॅकीज. शहरात ठिकठिकाणी सुंदर बगिचे. सुशोभित उद्याने. शहराच्या मध्यभागी क्रांती चौक. थोड्या दूर अंतरावर दिमाखात उभी असलेली नूतन महाविद्यालयाची इमारत. हे सगळं मनात होतंच. सहावीपासून शिक्षणासाठी या शहराशी माझा संपर्क आलेला. 

त्याआधी दर शनिवारी बाजार करण्यासाठी मी येत असे. नवीन चित्रपट लागला की ढोरक्या पोरांबरोबर सेकंड शो पहायला येत असे. आता तर मॉर्निंग आणि मॅटनीही पहायला मिळणार म्हणून आनंदात होतो. आमच्या गावचा एकमेव विद्यार्थी नूतन महाविद्यालयात शिकत होता, तो म्हणजे काळ्या रामाचा कचरु. आम्ही त्यांना के. आर. म्हणूनच बोलत असू. त्यांनीच माझे अ‍ॅडमिशन केले. मी सायन्स घेतले. पण वर्गातील चिकन्या चोपड्या पोरी अन् आमीर बापाची पोरं पाहून, हा आपला वर्ग नव्हे हे चार महिन्यांत आमच्या लक्षात आले. बारावीला साईड चेंज करुन परीक्षा दिली आणि मग आपल्या आवडीच्या कला शाखेत प्रवेश घेतला. विज्ञान शाखेत शिकत असतानाही मला कलेची आवड आहे, हे आमच्या सी. एम. देशपांडे सरांनी ओळखले होते. अकरावी पासूनच मी महाविद्यालयातील सर्व उपक्रमात सहभागी होत असे. 

अकराव्या वर्गात असतानाच मी प्रेरणा वार्षिक अंकाचा संपादक म्हणून निवडला गेलो, कारण माझा निबंध पहिला आला होता. यादव गायकवाड सरांशी माझी तिथेच पहिल्यांदा ओळख झाली. सर आमच्या संपादक मंडळाचे मार्गदर्शक होते. पुढे बी.ए. ला प्रवेश घेताना मी मुद्दाम मराठी विषय घेतला. कारण गायकवाड सर, ज्येष्ठ लेखक आणि चित्रकार प्रकाश कामतीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकता येईल. पदवीची वर्षे खूप मस्त गेली. कामतीकर सर काव्यशास्त्र शिकवायचे तर गायकवाड सर मराठी साहित्याचा इतिहास. कामतीकर सर पद्य तर गायकवाड सर गद्य, अशी समतोल जोडीच होती. 

आम्ही शासकीय वसतिगृहात राहात होतो. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाॅस्टेलर्स असोसिएशनचा अध्यक्ष असताना वसतिगृहात अनेकदा कार्यक्रमासाठी कामतीकर सर, गायकवाड सरांना आमंत्रित करत असे. माझ्या गावात सुद्धा समाजप्रबोधनपर कार्यक्रमासाठी गायकवाड सर अनेकदा उपस्थित राहिले आहेत.  सरांनी महाविद्यालयाच्या जवळच 'कलिंग' ही भव्य दिव्य वास्तू उभारली. सरांचे घर आम्हाला नेहमीच सताड उघडे असे.

महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावरही सरांच्या घरी तासनतास चर्चा करीत असत. सरांनी हवी तेवढी पुस्तके आम्हाला वाचायला दिली. समाजात कसे वागायचे, बोलायचे ते शिकवले. विश्वास वसेकर, सी. एम. देशपांडे, ग्रंथपाल अ. स. जोशी, प्रकाश कामतीकर, रामदास जायभाय, प्रभाकर रावते, पी.व्ही. काटे, नगराळे पप्पा, हीरा बयास मॅडम, विनायक कोठेकर, रमेश खरवडकर, भ. बा. शिंदे, गौतम सूर्यवंशी, सुरेश संदीकर, वसंत शेप, प्राचार्य द. रा. कुलकर्णी  आणि या. रा. गायकवाड सर या गुरुवर्यांनी दिलेली शिकवण कधीच विसरू शकणार नाही. प्रा. यादव गायकवाड सरांचा आज सेलू येथे  भव्य सत्कार करण्यात येणार आहे. सरांना खूप खूप शुभेच्छा! 
 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News