गुरुजींची नोकरीला गुरूजीच कंटाळले

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • वर्षानुवर्षे भरती रखडल्याचा मोठा परिणाम, युवकांनी फिरविली पाठ

औरंगाबाद - वर्षानुवर्षे रखडलेली भरती, बदल्यांमध्ये होत असलेली प्रचंड गैरसोय अशा विविध कारणांमुळे पूर्वी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिक्षकाच्या नोकरीला आता युवक ‘नको रे बाबा...’ म्हणू लागले आहेत. काही वर्षांपूर्वी बारावी झाली की, तरुणांची पहिली पसंती डीएडच्या अभ्यासक्रमाला होती. डी.एड. प्रवेशासाठी मुलांची झुंबड उडत असे.

जिल्ह्यातून एक लाख अर्जांपैकी केवळ वीस टक्के मुलांचे प्रवेश निश्‍चित होत. मात्र, मागील आठ वर्षांपासून शिक्षक भरती पूर्णपणे बंद आहे. अनेक विद्यार्थी डी.एड. करून बेरोजगार झालेले आहेत. त्यामुळे बारावीनंतर डी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात प्रवेश क्षमतेएवढेही अर्ज शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले नाहीत. परिणामी जिल्ह्यातील डी.एड. अभ्यासक्रमाच्या तब्बल दोन हजार जागा रिक्त राहणार, असे चित्र आहे. 

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक, संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे डी.एड. अभ्यासक्रमासाठी ३० जूनपासून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. २४ जुलैपर्यंत प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २३ डी.एड.ची महाविद्यालये आहेत. त्यामध्ये तीन शासकीय; तर २० विनाअनुदानित आणि एक उर्दू माध्यम (अल्पसंख्याक) विद्यालय आहे. जिल्ह्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या एकूण दोन हजार ४५७ जागा असून प्रवेशासाठी केवळ ६२७ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यातून फक्त ४६२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले असून एक हजार ९९५ जागा रिक्त आहेत. एकूण प्रवेशाच्या फक्त १९ टक्के जागा भरल्या आहेत. शनिवारपर्यंत (ता. तीन) विशेष फेरी सुरू राहणार आहे. यासाठी आतापर्यंत ५५ अर्ज आले आहेत. त्यापैकी ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. 

मागील वर्षी डी.एड.साठी जिल्हाभरातून साधारण सातशे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत डी.एड.ला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निम्म्याने घटली आहे. त्यातच शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याऐवजी काही विद्यार्थी व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशास पसंती देत आहेत. तिसऱ्या फेरीपर्यंत सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेतले आहेत. त्यात ९० टक्के प्रवेश हे उर्दू माध्यमाकरिता घेतलेले आहेत, असे परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News