तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारे गुरु

विशाल जगदाळे
Tuesday, 16 July 2019

गुरु म्हणजे ज्ञानाचे प्रतीक, गुरूने दिलेले ज्ञान अधिक निर्दोष करणे म्हणजे गुरुपुजा. गुरुभक्ती म्हणजे ज्ञान भक्ती. गुरु म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारे प्रतीक. गुरु म्हणजे अफाट सामर्थ्य.

"गुरु" या एका शब्दात जगातील अद्वितीय अशी शक्ती सामावली आहे. आपल्या गुरुवर्यांबद्दल लिहावे तेवढे कमीच. पण आज लिहिण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे...

          गुरुब्रह्म गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा,
        गुरु साक्षात परब्रह्म तास्मै श्री गुरुवै नमः...

           
गुरु म्हणजे ज्ञानाचे प्रतीक, गुरूने दिलेले ज्ञान अधिक निर्दोष करणे म्हणजे गुरुपुजा. गुरुभक्ती म्हणजे ज्ञान भक्ती. गुरु म्हणजे तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणारे प्रतीक. गुरु म्हणजे अफाट सामर्थ्य. गुरु म्हणजे जगाच्या ज्ञानसागरात पोहण्यासाठी दिलेली शिकवण. अशी ही गुरु महती कितीही शब्दात रेखाटली तरी कमीच आहे. गुरु-शिष्य हे नाते ब्रह्मांडातील विविध सूर्य-ग्रह, उपग्रह यांच्या मालिकेसारखे अतूट, आनंदी, अनादी आहे. विश्वाच्या उत्पत्ती पासून ते आजतागायत व यापुढेही प्रकाशगतीने विस्तारणाऱ्या आद्य गुरु यातूनच गुरूच्या व्याप्तीची, शक्तीची आणि विस्ताराची कल्पना येते. माणूस या आयुष्यभर शिकत असतो. ज्ञान मिळवत असतो. माणसाला गुरुसारखे कोणाकडून ज्ञान मिळत नाही. एक संतवचन आहे,

       जो जो जयाचा घेतला गुण,
       तो तो म्या केला गुरु जाण. 

म्हणून तर ज्ञानाचा ईश्वर असलेल्या ज्ञानदेवांनी सुद्धा आपले वडीलबंधू निवृत्तीनाथ यांना आपले गुरु मानले आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ रचला. संत कबीरांनी सुद्धा गुरूला श्रेष्ठ मानले ते लिहितात.

        गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय,
       बालिहारी गुरु आपणो जिन गोविंद दीयो बताय.

              
याबद्दल साने गुरुजी म्हणतात आदी नाही, अंत नाही, पूर्व नाही, पश्चिम नाही गुरु म्हणजे परिपूर्णता. म्हणूनच गुरु महिमा अगाध आहे. गुरुविण कोण दाखवील वाट याप्रकारे गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु आपल्याला संस्काराची खान होतात व जीवनात वर्तमानाची ओळख करून भविष्यासाठी बळ देतात. गुरु आपल्याला संपूर्ण ज्ञानाची भेट करवितात. त्या त्या ज्ञानप्रांतातील या क्षणपर्यंतच्या सकल ज्ञानाशी ते आपली सांगड घालून देतात. आपल्याला भविष्याची दिशा सांगतात. 

गुरु म्हणजे अज्ञानरूपी अंधारात स्वतःच्या ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून टाकणारे देवदूतच, गुरु म्हणजे साक्षात परब्रम्ह. गुरु म्हणजे अनंत ज्ञानाची तळमळ, गुरु म्हणजे सत्याच्या प्रयोगाची उत्कटता. प्रत्येकाच्या जीवनात तीन गुरु असतात. आई, वडील आणि तिसरे आपले शिक्षक. शिक्षक हे चुका सुधारण्याची शिकवण देऊन भावी आयुष्य उज्वल करणारे असतात. असे म्हणतात गुरु हे जन्माला यावे लागतात आणि शिष्य हे तयार व्हावे लागतात. हिरा कुठेही चमकतो पण पैलूशिवाय जगात दिसत नाही. तसेच ज्ञान अगाध, अनंत असते पण गुरुवाणीतूनच ते बोध देते. गुरुशिवाय विधा व्यर्थ आहे. 

गुरुची महती वर्णावी ती किती, जी शिष्याचे जीवन घडवती, आयुष्याला आकार व गती देती. ज्ञान, कला व अनुभव यांच्या आदान-प्रदानातून गुरु-शिष्य नातं जन्माला आलं. ज्ञान, अनुभव, त्याग, तपस्या, विवेक, वैराग्य, वत्सलता, अनुशासनप्रियता या आठ गुणांचं अष्टगंध लावलेले गुरु आदर्श असतात. गुरु जुनी मूल्ये जपत नवीन आव्हाने पेलत शिष्यांमध्ये स्फुल्लिंगे फुलवत असतात. 
           
"शि" म्हणजे शिलवंत, "क्ष" म्हणणे क्षमाशील, "क" म्हणजे कर्त्यव्यदक्ष या तीन अक्षरांचा शब्द म्हणजे शिक्षक. शिक्षक मुलांना घडवत असतात, शिक्षक ज्ञानी असतात, शिल्पकार असतात. म्हणूनच पाल्य आणि पालकांचा त्यांच्यावर भरोवसा असतो. शिक्षक हे आयुष्य नावाच्या वादळी आणि अंधारी वाटेवरचा दीपस्तंभ असतात.  शिक्षक म्हणजे निळ्या आकाशातील शुक्रतारा , ज्याची चमक विश्वाच्या अंतापर्यंत ओळखत राहील. यासाठीच आपण आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो. आपण ज्यांच्याकडून विद्या  प्राप्त करतो त्याच विध्येच्या बळावर आपला उद्धार होत असतो. अशा गुरूंना मान देणे आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. शेवटी इतकेच, 

 "गुरु आशीर्वाद मिळो, आम्हा सत्कृत्याची कृपाशक्ती"

शिंपल्यात पाणी घालून समुद्र दाखवता येत नाही, हाताने काढलेल्या फुलांना कधी सुगंध येत नाही, निळ्याभोर गगणाचा अंत कधी होत नाही, अन अशा गुरुवर्यांचा उल्लेख मात्र शब्दात करता येत नाही... प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मला घडवणाऱ्या सर्व गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News