"गुल्लक"मध्ये खऱ्याखुऱ्या नात्यांचे धमाल किस्से

विशाखा टिकले पंडित
Saturday, 27 July 2019

कसलाच फिल्मी मसाला नसलेली गुल्लक ही सीरिज. सर्वसामान्यांचं जगणं जसंच्या तसं दाखवणारी; पण हे जसंच्या तसं दिसणंच या सीरिजचा यूएसपी आहे. सततचा मेलोड्रामा पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना हलक्‍या-फुलक्‍या किश्‍शांनी हसवणारी ही सीरिज आहे.

कहाणी म्हटली की त्यात नाट्य येतं, हिरो येतो, व्हीलन येतो, कट कारस्थानं येतात. कहाणीला सुरुवात असते, शेवट असतो. या सगळ्यांपेक्षा वेगळं एक सर्वसामान्य आयुष्य असतं; ज्यात कहाणी नसते, असतात ते फक्त किस्से. अशी कुठलीही कथा नसलेली किश्‍शांवर आधारित एक उत्कृष्ट वेब सीरिज ‘सोनी लिव’वर नुकतीच प्रदर्शित झालीय. ‘गुल्लक’ नावाच्या पाच भागांच्या या सीरिजमध्ये खऱ्याखुऱ्या नात्यांचे असे धमाल किस्से पाहायला मिळतात.

संतोष मिश्रा या नोकरपेशा माणसाच्या चौकोनी कुटुंबाची ही गोष्ट; ज्यात मिश्राजींची बायको शांती, त्यांची दोन मुलं अन्नू व अमन एका जुन्या घरात राहत असतात. जुन्या घराची डागडुजी आणि मोठा मुलगा अमनला ऑफिसर झालेलं पाहणं ही दोन स्वप्नं एकत्रित जगणारं हे कुटुंब. दिवसभरात मिश्रांजीच्या घरात काय काय घडतं त्याचं चित्रण या सीरिजमध्ये पाहायला मिळतं.

नेमकं वेगळं घडतं तरी काय या घरात? काहीच नाही, नवरा-बायकोची रोजची भांडणं, भावाभावात कधी कमालीचं प्रेम; तर कधी चांगला मार बसेपर्यंतची मारामारी. कधी गल्लीतली भांडणं; तर कधी चुगलखोर शेजाऱ्यांची लुडबुड. तसं बघायला गेलं, तर कसलाच फिल्मी मसाला नसलेली ही सीरिज. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांचं जगणं जसंच्या तसं दाखवणारी; पण हे जसंच्या तसं दिसणंच या सीरिजचा यूएसपी आहे. सततचा मेलोड्रामा पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना हलक्‍या-फुलक्‍या किश्‍शांनी हसवणारी ही सीरिज आहे.

इथे पदर खोचून दिवसभर राबणारी, घराला प्रेमाच्या आणि रागाच्या धाकात ठेवणारी आई दिसते; तसंच बायकोच्या रागाला घाबरणारा, मुलांना मित्रत्वानं वागवणारा, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारा साधासुधा बाप दिसतो. या दोन व्यक्तिरेखा गीतांजली कुलकर्णी आणि जमील खान यांनी अप्रतिमरीत्या साकारल्या आहेत.

अन्नू, अमन आणि बिट्टू की मम्मी या अजून तीन व्यक्तिरेखाही उत्तम झाल्यात. गुल्लक (पिगी बॅंक) हे यातलं अजून एक पात्र. या पैसे साठवायच्या भांड्यात अनेक स्वप्नांसाठी पैसे साठवले जातात; पण अनेकदा अचानक उद्‌भवलेल्या चणचणीसाठी ‘गुल्लक’ फोडून गरज भागवली जाते. हा गुल्लक घरातल्या अनेक गोष्टींचा साक्षीदार असतो. एक गुल्लक फुटला तरी स्वप्नं पाहणं थांबत नाही. घरात नवीन गुल्लक येतो आणि आयुष्य पुढे चालू राहतं.

सीरिजमध्ये वारंवार हेच सांगितलंय की ये कहानी नही; किस्से है. भारंभार नात्यांचा गुंता नाही, कसलाही मेलोड्रामा नाही; फक्त रोजच्या आयुष्यातल्या कधी गोड; तरी कधी कटू किश्‍शांची पोतडी या सीरिजमध्ये मोकळी केलीय आणि ती निश्‍चितच पाहण्यासारखी आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News