नांदेडच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यपाल घेणार महत्वपूर्ण निर्णय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 17 November 2019

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्याच्या दिशेनेही राज्यपालांनी आता पावले उचलली असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची यादी मागविल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे.

नांदेड : राज्यात राष्ट्रपती राजवट लागु झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोशियार यांनी शनिवारी (ता.१६) प्रथमच ओल्या दुष्काळामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयाची मदत जाहीर करुन दिलासा देण्याचा प्रयत्न केले आहे. त्या पाठोपाठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीस माफ करण्याच्या दिशेनेही राज्यपालांनी आता पावले उचलली असून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची यादी मागविल्याची माहिती सुत्रांकडून समजली आहे.  

विद्यार्थ्यांना निश्‍चितच दिलासा मिळेल

यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे कन्हैया कदम यांनी शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक व परिक्षा शुल्क माफ करण्यात यावे यासाठी नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा  विद्यापीठाकडे मागणी केली होती. त्यानुषंगाने राज्यपाल यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फीस माफ करण्यासाठी नेमकी काय परिस्थिती आहे? या बद्दल सर्वच विद्यापीठ स्तरावरुन आकडेवारी मागवली आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लवकरच शैक्षणिक व परिक्षा शुल्क अशा दोन्ही प्रकारचे शैक्षणिक शुल्क माफ होणार असल्याने विद्यार्थ्यांना निश्‍चितच दिलासा मिळेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

मराठवाड्यातील शेतकरी त्रस्त

यंदा पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. सतत तीन ते चार वर्षांपासून शेतकरी नैसर्गिक आपत्तीशी लढा देऊन आपली उपजिविका करत आहे. दुबार पेरणी करूनही हाती आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने जगावे कसे? असा प्रश्‍न आता शेतकऱ्यांसमोर आहे. किंबहुना जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या मुलांनी फीस भरण्याची एेपत नसल्याने आपले शिक्षण अर्धवट सोडल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अशा मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांची सर्वप्रकारची शैक्षणिक शुल्क रद्द करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे आता खुद्द राज्यपालांनी यात लक्ष घातल्याने शिक्षण अर्धवट सोडण्याची वेळ आलेल्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

कुलगुरुंनी दिला दुजोरा

राज्यपालांचा निर्णय योग्य असला तरी, अनेक अडचणी निर्माण होणार आहेत. यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे फीस माफ करताना सरसकट करणार की, केवळ शेतकऱ्यांच्या मुलांची करायची? असा प्रश्‍न उपस्थित होणार आहे. शिवाय मागच्या वर्षाप्रमाणे पन्नास पैशा पेक्षा जास्त अनेवारी असलेले शेतकरी पाल्य अशा गोष्टीवर तोडगा काढुन त्या नंतरच विद्यार्थ्यांची फीस माफ करण्याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमधून दिड लाखावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. फीस माफीसंदर्भात राज्यपालांनी विद्यार्थ्यांनी मागितली असून स्वामी रामानंत तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांनी दुजोरा दिला आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News