सरकारची ही योजना ठरली मृत्यूला कारणीभुत; सख्ख्या भाच्याने पाडला आत्याचा मुडदा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

मोताळा: क्षुल्लक वादातून सख्ख्या भाच्याने दिव्यांग आत्याच्या कपाळावर कुर्‍हाडीने घाव घालून तिची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी (ता.10) रात्री 11: 45 वाजता घडली. या हत्याकांडात आरोपीला त्याच्या एका साथीदाराने मदत केली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

मोताळा: क्षुल्लक वादातून सख्ख्या भाच्याने दिव्यांग आत्याच्या कपाळावर कुर्‍हाडीने घाव घालून तिची निर्घृण हत्या केल्याची थरारक घटना तालुक्यातील तालखेड येथे सोमवारी (ता.10) रात्री 11: 45 वाजता घडली. या हत्याकांडात आरोपीला त्याच्या एका साथीदाराने मदत केली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

तालुक्यातील तालखेड येथील प्रभाकर निनू चोपडे (60) यांनी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली की, त्यांची बहीण नलुबाई निना चोपडे (65) या गावातीलच भाऊ बाळकृष्ण निनू चोपडे यांच्या घरात राहत होत्या. काही वर्षांपूर्वी भाऊ बाळकृष्ण चोपडे यांचे निधन झाल्यानंतर नलुबाई या भाचा राहुल बाळकृष्ण चोपडे (वय 28) याच्यासोबत राहू लागल्या. नलुबाई चोपडे या जन्मापासून उजव्या पायाने अपंग असून, त्यांना शासनाकडून दिव्यांग व निराधार योजनेतून दरमहा अनुदान मिळत होते. 

भाचा राहुल हा आत्या नलुबाई यांना नेहमी निराधार अनुदानाचे पैसे मागत होता. या कारणावरून राहुल व नलुबाई यांच्यात नेहमी वाद होत असत. या वादाच्या कारणावरून सोमवारी (ता.10) रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजताच्या सुमारास राहुलने आत्या नलुबाई यांच्या कपाळावर व उजव्या कानावर कुर्‍हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केली. नलुबाईला ठार मारण्यात राहुल चोपडे याला त्याचा मित्र पवन हरी चौधरी (20, रा. तालखेड) याने मदत केली, असे तक्रारीत नमूद आहे. 

या थरारक घटनेची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय प्रल्हाद मदन, एएसआय विनोद शिंदे, पोहेकाँ राजेश वानखेडे, पोकाँ संजय गोरे, पोकाँ सुनील भवटे, पोकाँ श्री मोरे, चालक शेख मुस्तकीम यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केला. या हत्याकांडाने तालखेड गावासह परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रभाकर निनू चोपडे यांच्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी राहुल बाळकृष्ण चोपडे व पवन हरी चौधरी या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. आज(ता.11) दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय प्रल्हाद मदन करीत आहेत.

काही तासातच आरोपी जेरबंद
तालखेड येथील हत्याकांडाची माहिती मिळताच बोराखेडीचे पीएसआय प्रल्हाद मदन यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, दोघा आरोपींचा शोध घेऊन काही तासातच दोघांना शिताफीने जेरबंद केले. काही दिवसांपूर्वी पीएसआय मदन यांनी मोताळा येथील बॅटरीच्या दुकानातील चोरी प्रकरणाचा चाणाक्षपणे तपास करीत दोन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.

या हत्याकांडाने समाजमन सुन्न
जन्मतः दिव्यांग असलेल्या नलुबाई यांना शासनाच्या निराधार योजनेच्या अनुदानाचा आधार होता. त्या अनुदानाची रक्कम हडप करण्यासाठी पुतण्या राहुल चोपडे हा नलुबाईला त्रास देत होता. या वादातूनच त्याने आत्या नलुबाईची निर्घृण हत्या केली आहे. या हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News