राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच संपणार ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019
  • राज्यसभेत पाच जागा रिक्त आहेत
  • आणि आणखी सहा खासदार पक्षात जाण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली : राज्यसभेत सरकारचा बहुमताचा दुष्काळ लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत. नैसर्गिक प्रक्रियेनुसार पुढील वर्षी (२०२०) भाजप येथे बहुमतात येईल. मात्र भाजप नेतृत्वाची तेवढेही थांबण्याची तयारी नसल्याचे बोलले जाते. पुढच्या महिनाभरात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकांतच भाजपला राज्यसभेत बहुमतात आणण्यासाठी पक्षनेतृत्वाने कंबर कसली आहे.

वरिष्ठ सभागृहात सध्या बहुमतापासून केवळ पाच सदस्य संख्येइतक्‍या दूर असलेल्या भाजपच्या संपर्कात विरोधी पक्षांचे तब्बल सहा खासदार असून, अन्य पाच जागा रिकाम्या आहेत. या पाचपैकी तीन जागा भाजप आघाडीला मिळणे निश्‍चित आहे व विरोधकांपैकी जेवढे भाजपवासी होतील तेवढे, असे मिळून लवकरात लवकर राज्यसभेत बहुमत आणून तोंडी तलाक, दहशतवादविरोधी कायदा, काश्‍मीरबाबतचा संभाव्य कायदा आदी कळीची विधेयके येथे धडाधड मंजूर करण्याचा पक्षनेतृत्वाचा स्पष्ट इरादा दिसत आहे.

सपचे नीरज शेखर नुकतेच भाजपमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ या पक्षाचे किमान चार खासदार भाजप नेतृत्वाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. खुद्द सपच्या एका ज्येष्ठ नेत्याने संसद परिसरात अनौपचारिकरीत्या बोलताना याबद्दलची कबुली दिली. असे झाल्यास विधेयकांच्या मंजुरीसाठी विरोधकांची मनधरणी टळेल.

पोटनिवडणुकीत रामविलास पासवान, स्मृती इराणी व एस. जयशंकर हे तीनही खासदार भाजपने निवडून आणले. तेलुगू देसमचे चार खासदार नुकतेच सत्तारूढ बाजूला आले आहेत. यामुळे राज्यसभेत काँग्रेसपेक्षा आताच मोठा पक्ष असलेली भाजप आघाडी येथील बहुमताच्या जादुई आकड्यापासून (१२३) केवळ पाच खासदारांपुरती दूर आहे. 

भाजपला लाभ होणार
राज्यसभेत आजच पाच जागा रिक्त आहेत. राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष मदनलाल सैनी यांचे निधन, शरद यादव यांची अपात्रता, नीरज शेखर यांचा राजीनामा तसेच तमिळनाडू व ओडिशातील प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. यातील पहिल्या तीन जागा भाजप निवडून आणू शकतो.

उर्वरित दोन्ही राज्यांत अण्णा द्रमुक व ओडिशाचे नवीन पटनाईक यांचा कल सरळसरळ भाजपकडेच आहे. साहजिकच भाजपला पाच जागांचा लाभ होऊ शकतो. शिवाय सत्तारूढ पक्षात सपचे चार खासदार आले तर हे बहुमत आणखी मजबूत होईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News