सरकारकडे मुंबई विद्यापीठाचे २७. ९८ कोटी थकीत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 October 2019
  • मुंबई विद्यापीठाच्या काही प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. यासाठीची तरतूद सरकारकडून अर्थसंकल्पात केली
  • सद्यस्थितीला ६५. १२ कोटींपैकी तब्बल २७. ९८ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवले आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या काही प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. यासाठीची तरतूद सरकारकडून अर्थसंकल्पात केली असली तरी सद्यस्थितीला ६५. १२ कोटींपैकी तब्बल २७. ९८ कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवले आहे. प्रलंबित अनुदानाच्या योजनेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासन, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान, मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरण आणि प्रकल्प माय मराठीचा समावेश आहे.

मुंबई विद्यापीठास राज्य सरकारकडून मिळणाऱ्या विविध अनुदानांची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाचे उपकुलसचिव राजेंद्र अंबावडे यांनी गलगली यांना माहिती दिली आहे. त्यानुसार लेखा व विकास कक्षासाठी ६३ कोटी ३२ लाख ७२ हजार ९९७ रुपये मंजूर अनुदान होते. पण प्रत्यक्षात ३५ कोटी ८२ लाख ७२ हजार ९९७ रुपये प्राप्त झाले असून २७ कोटी ५० लाख ही रक्कम प्रलंबित आहे. 

या सामाजिक कक्षा अंतर्गत महिला वसतिगृहासाठी १० कोटी, रत्नागिरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयासाठी १.७९ कोटी, सिंधुदुर्ग येथे विजयालक्ष्मी महाविद्यालयासाठी ९१.५७ लाख, महाराष्ट्र राज्य विश्‍वकोश निर्मिती मंडळासाठी ५७.६० लाख, अखिल भारतीय उच्च शिक्षण सर्वेक्षण कार्यासाठी ४.१३ लाख असे अनुदान प्राप्त झाले आहे. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासनासाठी ५ कोटींपैकी १ कोटी अनुदान प्राप्त झाले आहे. उर्वरित ४ कोटी रक्कम सरकारकडे प्रलंबित आहे. जर्मन विभागाकरिता १.८० कोटी मंजूर अनुदानांपैकी १ कोटी ३१ लाख ७२ हजार ७०० रक्कम दिली आहे., तर ४८ लाख २७ हजार ३०० रक्कम प्रलंबित आहे. दरम्यान, सरकारने २००९-१० ते २०१८-१९ या गेल्या १० वर्षांत संकीर्ण विभागातील मंजूर अनुदानाची रक्कम १०० टक्के दिली असून ती रक्कम २ कोटी ७४ लाख ६३ हजार ६३३ इतकी आहे.

शिक्षा अभियानाची रक्‍कमही प्रलंबित
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानासाठी २० कोटी अनुदान मंजूर केले आहेत. त्यापैकी १५ कोटी प्राप्त झाले असून ५ कोटी रक्कम प्रलंबित आहे. मुंबई अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणासाठी २५ कोटी मंजूर असताना सरकारने केवळ ६.५० कोटी दिले असून १८.५० कोटी रक्कम आजही प्रलंबित आहे. असे एकूण ६३ कोटी ३२ लाख ७२ हजार ९९७ मंजूर अनुदानापैकी सरकारने ३५ कोटी ८२ लाख ७२ हजार ९९७ रुपये विद्यापीठास दिले असून २७ कोटी ५० लाख रक्कम प्रलंबित आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News