खुशखबर ! सातवा वेतन आयोग लवकरच पालिका कर्मचाऱ्यांना होणार लागू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 24 July 2019
  • मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
  • प्रत्यक्ष लाभ १ सप्टेंबरपासून

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांना खूषखबर दिली आहे. 

राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१९ पासून ७ वा वेतन आयोग लागू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील मंजूर व नियमित अधिकारी-कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे.

लाभार्थी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची ७ व्या वेतन आयोगाची थकबाकी पुढील ५ वार्षिक समान हप्त्यात देण्यात येणार आहे. राज्यातील ३६२ पैकी १४६ नगर परिषदा व नगरपंचायतींना सध्या देण्यात येणाऱ्या सहाय्यक अनुदानातूनच अतिरिक्त वेतनाचा खर्च भागविला जाणार आहे. 

जकात रद्द झाल्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाचा आर्थिक स्त्रोत मंदावला आहे. त्यातच जीएसटीच्या पहिल्या सुरुवातीच्या वर्षातदेखील या नागरी स्थानिक संस्थाना आर्थिक चणचण भासत आहे. अशा स्थितीत सातव्या वेतन आयोगाची घोषणा केल्याने कर्मचारी व अधिकारी वर्गाला मोठा दिलासा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News