व्होकेशनल अभ्यासक्रमातून सुवर्णसंधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 20 June 2019

रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्यास आवश्‍यक असलेले तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालून हा अभ्यासक्रम आता खालीलप्रमाणे सहा गटांमध्ये विभागण्यात आला आहे.

इयत्ता अकरावी व बारावीच्या स्तरावर कला, विज्ञान व वाणिज्य शाखेप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाच्या कौशल्य विकास योजनेंतर्गत उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण (एच.एस.सी. व्होकेशनल) अभ्यासक्रम संपूर्ण महाराष्ट्रात विविध संस्थांमध्ये १९८८-८९ पासून सुरू केलेले आहेत.

विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाकडे न वळता व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतल्यास रोजगार, स्वयंरोजगार, तसेच उच्च शिक्षणाच्या संधीही उपलब्ध होतात. या अभ्यासक्रमात ३० टक्के सैद्धांतिक (थिअरी) व ७० टक्के प्रात्यक्षिके (प्रॅक्‍टिकल्स) शिकविली जातात. औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार आधुनिक तंत्रज्ञानातून होणारे बदल व त्यानुसार रोजगार व स्वयंरोजगार सुरू करण्यास आवश्‍यक असलेले तांत्रिक कौशल्य यांची सांगड घालून हा अभ्यासक्रम आता खालीलप्रमाणे सहा गटांमध्ये विभागण्यात आला आहे.

अ) इंजिनिअरिंग गट 
१) इलेक्‍ट्रॉनिक्‍स टेक्‍नॉलॉजी, २) इलेक्‍ट्रिकल टेक्‍नॉलॉजी, ३) मेकॅनिकल टेक्‍नॉलॉजी, ४) ऑटोमोबाईल टेक्‍नॉलॉजी, ५) कन्स्ट्रक्‍शन टेक्‍नॉलॉजी, ६) कॉम्प्युटर टेक्‍नॉलॉजी

ब) कॉमर्स ॲन्ड ट्रेड गट 
१) लॉगिस्टिक ॲन्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, २) मार्केटिंग रिटेल मॅनेजमेंट, ३) अकाउंटिंग, फायनान्शियल ऑफिस मॅनेजमेंट, ४) बॅंकिंग फायनान्शियल सर्विसेस ॲन्ड इन्शुरन्स 

क) पॅरामेडिकल गट
१) मेडिकल लॅबोरेटरी टेक्‍निशियन, २) रेडिओलॉजी टेक्‍निशियन, ३) ओप्थॅल्मिक टेक्‍निशियन, ४) चाइल्ड, ओल्ड एज ॲन्ड हेल्थ केअर सर्विसेस

ड) कॅटरिंग ॲन्ड फूड टेक्‍नॉलॉजी गट
१) टुरिझम ॲन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, २) फूड प्रॉडक्‍शन

इ) ॲग्रिकल्चर गट
१) हॉर्टिकल्चर, २) क्रॉप सायन्स, ३) ॲनिमल हजबंड्री ॲन्ड डेअरी टेक्‍नॉलॉजी 

ई) फिशरीज गट
१) फिशरीज टेक्‍नॉलॉजी
विद्यार्थ्यांचा कल, आवड, बौद्धिक कुवत, व्यक्तिमत्त्व या गोष्टींचा विचार करून विद्यार्थी वरीलपैकी कोणत्याही एका अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो. या अभ्यासक्रमाची परीक्षा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ घेत असल्यामुळे विद्यार्थ्यांना एच.एस.सी. बोर्डाचे गुणपत्रक व प्रमाणपत्र मिळते.

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुणे विद्यापीठाच्या संबंधित विषयाच्या विविध पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. 
इंजिनिअरिंग गटातील विद्यार्थ्यांना त्या विषयाशी निगडित इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या द्वितीय वर्षास थेट प्रवेश घेण्याची सोय उपलब्ध आहे. हे सर्व अभ्यासक्रम रोजगार व स्वयंरोजगारपूरक आहेत.हा व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्यास विद्यार्थी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक उन्नती करून आपले करिअर घडवू शकतो शिवाय पुढे उच्च शिक्षणही घेऊ शकतो.

गरजेनुसार कुशल मनुष्यबळनिर्मिती व व्यवसायासाठी विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे करून लवकरात लवकर रोजगार उपलब्ध करून देण्याचा या अभ्यासक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News