कारवाईनंतरही वाहनांवर गॉगल ग्लास! काचेवरील काळे आवरण फाडण्याचा पोलिसांना अधिकार

परशुराम कोकणे 
Tuesday, 2 July 2019
  • काचेवरील काळे आवरणे फाडण्याचा पोलिसांना अधिकार आहे
  • दिल्लीत संसदेवर 2001 मध्ये अतिरेक्‍यांनी हल्ला केला.
  • तेव्हापासून सरकारने वाहनाला गॉगल ग्लास लावण्यास बंदी घातली.

सोलापूर: चार चाकी वाहनांवर लावण्यात येणाऱ्या गॉगल ग्लासवर सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. 200 रुपयांच्या दंडात्मक कारवाईनंतर वाहनांना सोडून दिले जाते. काचेवरील काळे आवरणे फाडण्याचा पोलिसांना अधिकार आहे, पण सर्वच ठिकाणी तसे होताना दिसत नाही. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात सुरक्षेच्या दृष्टीने गॉगल ग्लासकडे दुर्लक्ष करणे धोक्‍याचे आहे. 

दिल्लीत संसदेवर 2001 मध्ये अतिरेक्‍यांनी हल्ला केला. त्यावेळी अतिरेकी गॉगल ग्लास लावलेल्या वाहनामधून आले होते. तेव्हापासून सरकारने वाहनाला गॉगल ग्लास लावण्यास बंदी घातली. कार व अन्य वाहनांना गॉगल ग्लास लावल्यामुळे आतमध्ये नेमके काय आहे, कोण बसले आहे हे दिसत नाही. आतमधून बाहेर सहज पाहता येते. गॉगल ग्लास लावणाऱ्यांवर पोलिसांकडून 200 रुपये दंडाची कारवाई केली जाते. अनेक वाहनचालक 200 रुपये दंड भरून सुटका करून घेतात. घरी गेल्यावर ग्लास काढतो असे सांगतात, मात्र ग्लास काढले जात नाही. 

अनेक वाहनचालक ऊन लागू नये म्हणून, आतमध्ये एसी सुरू आहे म्हणून गॉगल ग्लास लावल्याचे कारण पोलिसांना सांगतात. त्यावर उपाय म्हणून उन्हापासून संरक्षणासाठी आतमध्ये पडदे लावता येऊ शकतात. गॉगल ग्लास हाताने ओढून घेण्याचे अधिकार न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. अनेकदा गॉगल ग्लास काढल्यानंतर वादही झाले आहेत. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गॉगल ग्लास लावणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात असल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या सहा महिन्यात शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्यावतीने 522 वाहनांवर गॉगल ग्लास लावल्याप्रकरणात दंडात्मक कारवाई केली आहे. यात 68 हजार 600 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. कारवाई झालेल्या अनेकांनी दंड जमा केला नसल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेतून देण्यात आली.

 

केंद्रीय मोटार वाहन नियम कलम 100 अन्वये वाहनाला गॉगल ग्लास लावणे हा दंडनीय अपराध आहे. 25 एमएम आकारामध्ये लाइट ग्लास लावण्यास हरकत नाही. शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गॉगल ग्लास लावणाऱ्यावर वाहनांवर कारवाई केली जात आहे. गॉगल ग्लास लावणाऱ्यांवर 200 रुपये दंडाची कारवाई केली जाते. 

- विजयानंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News