लहानपण देगा देवा...

सुहास दिनेश शुक्ल
Saturday, 17 August 2019

कोण आधी पळत जाऊन घेऊन येईल याची चढाओढ असायची माझ्यात आणि माझ्या बहिणीत बहुदा त्यालाच नात्यांची ओढ म्हणत असावेत...

आजचा दिवस खुप मस्त आहे स्वतंत्रता दिवस आणि रक्षाबंधन म्हणजे दुग्ध शर्करा योग...

रक्षाबंधनाच्या पंधरा दिवस आधी राख्या निवडायची लगबग सुरु असायची माझ्या दोघ बहिणी गावात जाऊन छानश्या राख्या घेऊन यायच्या त्यातल्या काही राख्या आई मामांकरता पाठवायची त्यात एक छानशी चिट्ठी लिहायची... पोस्ट बॉक्स मध्ये टाकण्याचे काम मी आणि लीनाताई कडे असायचे. पोस्टात टाकल्यावर असे वाटायचे कि खुप मोठ्ठी जबाबदारी पार पाडली...

पुर्वी पोस्टमन देवापेक्षा कमी नव्हते पत्र, राख्या, मनी ऑर्डरी आणि सुख दुःख पोहचवायचं सुंदर काम अगदी न चुकता अविरत पणे चालायचं... त्यात माझ्या आत्यांच्या राख्या यायच्या पोस्टमन काकांचा आवाज आला कि कोण आधी पळत जाऊन घेऊन येईल याची चढाओढ असायची माझ्यात आणि माझ्या बहिणीत बहुदा त्यालाच नात्यांची ओढ म्हणत असावेत...

वातावरण निर्मिती करण्यात माझ्या बहिणी भारी... आणि का नाही शेवटी त्यांचा सण सुट्टी असल्यामुळे तो दिवस उजाडला कि सकाळी लवकर उठून तयार असायचो... सकाळी उठल्यापासून आई सांगायची कि आज भांडू नका... पण ऐकेल तो बाळा कसला... देवपूजा आणि सर्व सोपस्कार झाल्यावर देवांना राख्या बांधुन आप्पांचा(माझे वडील)आणि माझा नंबर यायचा...

राख्या बांधल्यावर आप्पांनी दिलेले पैसे ताटात ओवाळणी म्हणुन टाकताना खुप मोठं मोठं वाटायचं... मग वाकुन नमस्कार केला कि बहिणींच्या डोळ्यातला विजयी भाव कधीच चुकला नाही त्या दिवशी मी आणि माझ्या बहिणी आम्ही ओवाळणी झाल्यावर फोटो काढायला गेलो खरंच तो दिवस मंतरलेला होता. मी नवीन ड्रेस, लीनाताई आणि पिंकीताईने साडी घातली होती... पुर्वी फोटो सेशन खुप अगदी कमी असायचे पण लाईफ टाइम् टिकणारे. 

घरी आल्यावर छान बासुंदीचे जेवण आणि दुपारी मस्त झोप... शॉर्ट बट स्वीट... संध्याकाळी बहिणी खुश कारण वेगळे सांगणे नको... दुसऱ्या दिवशी शाळेत अगदी हात भरून राख्या बांधल्या जायच्या... आई अगदी आठवणीने दप्तरात पेंसिली आणि खोडरबर द्यायची ओवाळणी म्हणुन द्यायला... दिवस असाच निघून जायचा सगळे खूष शिक्षकांचे टेन्शन नाही...

शाळेतुन दुपारच्या वेळेस घरी येताना राखीतून गळलेले गोल आकाराचे स्पंज गोळा करून हवेत रस्त्यावर सोडुन कुणाचा किती लांब जातो हा खेळ महिना भर तरी चाले... मग एक दोन दिवसात अंघोळीबरोबर राख्यांचे गोंडे गळून पडायचे पण धागे मात्र बैल पोळ्या पर्यंत असायचे अगदी भावा बहिणींच्या अतुट नात्यांसारखं... माझ्या सर्व बहिणींना रक्षाबंधनाच्या खुप खुप शुभेच्छा... एक मात्र खरंय "लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा..."
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News