।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।।

डॉ. गंगाराम ढमके
Friday, 5 July 2019


।। जाता पंढरीसी सुख वाटे जीवा ।।
सुखासाठी धपडणाऱ्या मानवी जीवाला जेव्हा पंढरीच्या सुखाचे डोहाळे पडतात; तेव्हा एकच ध्यास मनात निर्माण होतो तो म्हणजे पंढरीशी जाऊन तिथल्या विठ्ठलाला भेटायचं. सासुरवाशीण लेकीला माहेराची ओढ ज्या कारणानं लागते, तीच ओढ विठ्ठलाला भेटणाऱ्या वारकऱ्याला असते.
 

ggdhamake@gmail.com

सुखासाठी धपडणाऱ्या मानवी जीवाला जेव्हा पंढरीच्या सुखाचे डोहाळे पडतात; तेव्हा एकच ध्यास मनात निर्माण होतो तो म्हणजे पंढरीशी जाऊन तिथल्या विठ्ठलाला भेटायचं. सासुरवाशीण लेकीला माहेराची ओढ ज्या कारणानं लागते, तीच ओढ विठ्ठलाला भेटणाऱ्या वारकऱ्याला असते.

सुख म्हटलं की मनाला आनंद देणाऱ्या आल्हाददायी जाणिवांचा स्पर्श. सृष्टीतील प्रत्येक प्राणिमात्राला सुखाचा सहवास हवाहवासा वाटतो. अर्थात, प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगवेगळी असते. सारेच जीव सुखाच्या शोधात भटकत असतात. या शोधात अस्तित्व लयास जाते; पण हा शोध संपत नाही. सुख मानण्यात असते असं नेहमी म्हटलं जातं. हे मानणं ज्याला जमलं, त्याला सुखाचा महासागर लाभला असंच म्हणावं लागेल. मनाच्या या अवस्थेला हवी एक अशी ऊर्जा, जी त्याला काबूत ठेवून निखळ आनंदाचे तरंग निर्माण करते. ही ऊर्जा तात्पुरत्या स्वरूपात निर्माण होणारी स्थितिक ऊर्जा नको. त्यासाठी हवा अक्षय ऊर्जास्रोत आणि हा ऊर्जास्रोत मिळतो तो नामस्मरणातून. म्हणूनच म्हटलं जातं ‘भंग नाही नाम ठेविले अभंग.’ एकदा नामाची गोडी लागली, की सुखाच्या सीमारेषाच उरत नाहीत. शाश्‍वत सुखाचा मार्ग शोधता शोधता दुरून दिसायला लागते विठूरायाची पंढरी.
जाता पंढरीसी सुख वाटे जीवा
आनंदे केशवा भेटताची।
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी
पाहिली शोधोनी अवघी तीर्थे

भेटीची इच्छा, ध्येय पक्कं झालं, की मग फक्त चालणं आणि चालणं. पावलांचा रस्ता ठरलेला असतो. येणाऱ्या अडचणी, अडथळे गृहीत धरूनच हा प्रवास सुरू होतो. हा प्रवास त्यांनी स्वतःहून स्वीकारलेला असतो. त्यात बळजबरी नसते. आवडीचं असलेलं कोणतंही काम सुलभ होतं. हाच अनुभव वारकऱ्यांना वारीसोबत चालताना येत असतो. निश्‍चित ध्येयाकडे वाटचाल करताना थकवा अथवा कंटाळा येत नाही. वारकऱ्यांचं ध्येय ठरलेलं असतं. ते म्हणजे विठ्ठलाचं दर्शन.
वाट पाहे बाहे निढळी ठेवुनिया हात,
पंढरीच्या वाटे दृष्टी लागलेसे चित्त
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे
मन उतावीळ भाव सांडोनिया देहे
तुका म्हणे धन्य ऐसा दिवस तो कोण।

प्रेम या शब्दात असते ओढ. साखरेच्या ओढीनं मुंगीनं चालावं, सागराच्या ओढीनं नदीनं वाहावं, मकरंदाच्या ओढीनं भुंग्यानं गुणगुणावं. तद्वतच विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीनं वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेनं सहज मार्गक्रमण करायला लागतात. आपला मायबाप विठ्ठल आपली वाट पाहत आहे ही आशा मनाला जागवीत राहते. ना कसली खंत ना खेद, ना वेदना ना विरह, फक्त आणि फक्त विठ्ठल. मग सुरू होते सुखाची पर्वणी असणारी वारी.
बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल,
करावा विठ्ठल जीवभाव।
येणे सोसे मग झाले हावभरी,
परती माघारी घेत नाही।
तुका म्हणे देह भरीला विठ्ठले,
काम, क्रोध केले घर रिते।।
वारी म्हणजे भूतलावरील ऊर्जा मंडळ. नभोमंडळातील सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना सूर्यापासून केवळ प्रकाश मिळतो असं नाही, तर त्यांच्या फिरण्याचं कारणही तोच ठरतो. अवकाशातल्या सूर्यमंडळाप्रमाणं वारकऱ्यांचं भूमंडळ म्हणावं लागेल. ज्यात विठ्ठलरूपी सूर्य आणि विठ्ठलनामाची असंख्य किरणं वारकऱ्यांना ऊर्जित करतात. ही ऊर्जा त्यांना जगण्याचं बळ पुरवते. ग्रहांच्या परिभ्रमणाच्या कक्षा ठरलेल्या असल्यानं ते परस्परांपासून दूर जाऊ शकत नाही. हीच अवस्था वारकऱ्यांची असते. वारकऱ्यांना मिळणारी ही ऊर्जा भावनिक ऊर्जा असते. परस्परांच्या संगतीनं चालताना भावनिक बळ निर्माण होतं. पाहता पाहता सारे भाव दूर होऊन जातात आणि उरते ती एकरूपता.
कपाळी अबीरबुक्का, गळ्यात तुळशीची माळ आणि हाती नादमय बोलणारे टाळ ही वारकऱ्यांची श्रीमंती. अंगावरचा पोषाख मनाची शुभ्रता वाढवणारा. काळ्या डांबराच्या वाटेनं जाणारा शुभ्रतेचा पाट आणि बाजूला सोबत असलेला हिरवाईचा घाट असा वारकरी थाट पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. पाठीवरचं गाठोडं म्हणजे सारा प्रपंच. इथे नसते भीती काही हरवण्याची ना चोरण्याची. प्रत्येकजण देहभान विसरून नामोच्चारात तल्लीन झालेला असतो. त्यामुळं चोरी होते ती फक्त नामाची आणि गोडी लागते तीही नामाचीच.
धरिता पंढरीची वाट, नाही संकट मुक्तीचे।
वंदू येती देव पदे, त्या आनंदे उत्साहे।
नृत्ये छंदे उडती रज, जे सहज चालता।।

अनेकांत एकता हे वारीचं वैशिष्ट्य. त्यातून सामाजिक ऊर्जा निर्माण होते. ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग.’ ही अवस्था अनुभवायला मिळते. सामाजिक एकोपा पाहायचा असेल तर तो वारीत. वारीच्या ठिकाणी एकच बोलणं, एकच चालणं आणि त्यातून एक समाधी लागते. सारे भेद एकरूप होऊन जातात. विठ्ठलनामात तल्लीन झाल्यानं ‘स्व’ उरतच नाही. उरतो तो अवघा विठ्ठलनामाचा समाज.

वारीत होणारी ऊरभेट परस्परांच्या आंतरिक शक्तीला उजळण्याचं काम करते. या देहीचं त्या देही एकरूप होणं सुरू होतं. एकाला दोन भेटतात, दोनाला चार, चाराला चारशे, हजार आणि मग असंख्य पावलं चालू लागतात. मुक्कामाच्या ठिकाणी होणारं नामसंकीर्तन मनाची मशागत करते; तर दिवसभर चालताना ओठातील नाम शरीराला शीतल ठेवते.

भावनिक आणि सामाजिक ऊर्जा एकवटल्या की मग शारीरिक ऊर्जा आपसूकच कार्यप्रवण होते. विठ्ठलनामाच्या सोबतीनं संपूर्ण वारकरी श्रमाचं ओझं विसरून जातो आणि पाहता पाहता भीमातीरी केव्हा येऊन ठेपतो हे त्यालाही कळत नाही. ही ओढच इतकी अनावर असते, की मनाला इतर विषयांचा स्पर्शच उरत नाही.

पंढरीची वाट पाहे निरंतर, निढळावरी कर ठेवुनिया।
तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा, भेटशी केशवा पांडुरंगा।।

इथे प्रत्येकाच्या मनात असतो दृढविश्‍वास. एक वेळ मशागत करून पीक येईलच याची खात्री नसते, आकाशात ढग जमले म्हणजे पाऊस पडेलच हे सांगता येत नाही. लावलेल्या रोपट्याला फळंफुलं येतीलच याची शाश्‍वती नसते, पण वारीत चालणाऱ्या पावलांना पंढरीत पोहचताच पांडुरंगाचे दर्शन होईलच याची खात्री असते. आपल्या लाडक्‍या दैवताचं मुखदर्शन होणार ही शाश्‍वती असते. हाच आशावाद वारकऱ्यांच्या पावलांना बळ देतो, ऊर्जा पुरवतो. ‘पंढरीचा वारकरी, खेपा वैकुंठबंदरी।’ या बंदरावर आल्यावर किनारा लागतोच.

प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूरच्या माहेराचा अभिमान आहे. इथे नसते कुणाची हेळसांड, नसते कुणा एकाची मिरासदारी. हे एकच असं स्थान आहे जिथं प्रत्येकाला मालकी हक्काची जाणीव होते. इथे नसतो नकार, असते ती फक्त मिरासदारी आपल्या हक्काच्या माहेराची.

आपुली मिरासी पंढरी, आमुचे घर भीमातीरी।।
पांडुरंग आमचा पिता, रखुमाई आमुची माता।
भाऊ पुंडलिक मुनी, चंद्रभागा आमुची बहिणी।
तुका जुनाट मिरासी, ठाव दिला पायापाशी।।

ही परमोच्च सुखाची शिदोरी लाभलेल्या वारकऱ्याची वाट सोपी आणि सुगम होते. परमेश्‍वरभेटीची ऊर्जा वर्षानुवर्षे माणसाला आनंदाच्या डोहात डुंबायचं सुख देते. वारकऱ्यांसाठी विठ्ठलमय रूपात मिळणारा हा ऊर्जास्रोत युगानुयुगे सुखावण्याचं काम करेल यात शंका नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News