राहुल गांधींना पुरेसा वेळ द्या, तेच भाजपला हरवतील

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • वीरप्पा मोईली : अंतर्गत वाद संपवण्यासाठी राहुल गांधींनी कठोर निर्णय घ्यावेत

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाला आता मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संपूर्ण पक्षाची पुनर्रचना करायला हवी, पक्षात सर्व पातळ्यांवर निवडणुका घेऊन अंतर्गत वाद संपविण्यासाठी कठोरपणे निर्णय घ्यावेत, असा सल्ला ज्येष्ठ नेते एम. वीरप्पा मोईली यांनी आज दिला. गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे. मात्र, पक्षाच्या खराब कामगिरीसाठी संबंधित राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांना जबाबदार धरले जावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेतृत्व गांधी यांनीच करावे, असे स्पष्ट करत मोईली म्हणाले, की पक्षाच्या कार्यकारिणीनेही एकमताने गांधी यांच्या नावावर विश्‍वास दाखविला आहे. गांधी यांना पक्षाध्यक्ष म्हणून अवघा दीड वर्षाचा कालावधी मिळाला आहे. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा. 

महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाना या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी गांधी यांनी तातडीने मैदानात उतरायला हवे. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण असावा, याचा विचार करण्याची ही वेळ नाही. वेळ न दवडता गांधी यांनी योग्य व्यक्तींकडे राज्यांची जबाबदारी द्यावी. निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करायला हवी, असे मोईली यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर काँग्रेस पक्षाला मोठ्या ‘शस्त्रक्रिये’ची गरज असून, ती पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी हेच करू शकतात.
- एम. वीरप्पा मोईली, 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News