"गर्लफ्रेंण्ड" आजच्या पिढीची हटके प्रेमकथा 

संतोष भिंगार्डे 
Saturday, 27 July 2019

मराठी चित्रपटसृष्टीत विविध विषय हाताळले जात आहेत आणि प्रेक्षक अशा विषयांचे चांगले स्वागत करीत आहेत. विशेष म्हणजे तरुण दिग्दर्शकांची नवी फळी येत आहे आणि नावीन्यपूर्ण विषय ते हाताळत आहेत. त्यांच्या कथा-कल्पना नवनवीन आहेत आणि त्याची मांडणीही सुरेख आहे. काहीसे हटके विषय आणि अगदी मन फ्रेश करणारे. दिग्दर्शक उपेंद्र सिधयेचा ‘गर्लफ्रेंण्ड’चा विषयही असाच फ्रेश आणि तजेलदार आहे. 

चित्रपट दिग्दर्शित करण्याचा उपेंद्र सिधयेचा पहिलाच प्रयत्न आहे आणि या पहिल्याच प्रयत्नात तो उत्तीर्ण झाला आहे. मुळात तो एक पटकथा व संवादलेखक. त्यामुळे विषयाची नेमकी मांडणी कशी आणि काय करावी... त्या विषयाला खणखणीत संवादांची जोड कशी द्यावी, हे त्याला माहीत असल्यामुळे त्याने या फ्रेश विषयाला चांगला न्याय दिला आहे. कलाकारांनीही आपल्या कसदार आणि कौशल्यपूर्ण अभिनयाने त्याला उत्तम साथ दिली आहे. या चित्रपटातील संवाद आजच्या पिढीची भाषा बोलणारे आहेत. ही एक प्रेमकथा आहे आणि ती हटके आहे. 

नचिकेत प्रधान (अमेय वाघ) हा सरळ-साध्या स्वभावाचा तरुण. तो एका कंपनीत ग्राफिक डिझायनर्स म्हणून काम करीत असतो. त्याचे दोन जिवलग मित्र, सॅंण्डी (सुयोग गोऱ्हे) आणि आदित्य (उदय नेने). ते कॉलेजचे मित्र. परंतु आता आपापल्या कामात ते बिझी असतात. त्याच्या दोन्ही मित्रांना गर्लफ्रेण्ड असते. परंतु नचिकेतला काही गर्लफ्रेण्ड नसते. त्यामुळे त्याचे मित्र; तसेच ऑफिसातील सहकारी... त्याचे बॉस... त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ त्याची थट्टामस्करी करीत असतात. व्हॅलेंटाईनच्या दिवशी नचिकेतचा वाढदिवस असतो आणि आपल्या वाढदिवशीच तो आपण रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर करतो. आलिशा (सई ताम्हणकर) असे आपल्या गर्लफ्रेण्डचे नाव. मग ती कुठून येते आणि ती आल्यानंतर कोणत्या कोणत्या गमतीजमती घडतात हे पडद्यावर पाहिलेले बरे. 

सई ताम्हणकर आणि अमेय वाघ ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे आणि दोघांनीही छान ॲक्‍टिंग केली आहे. नचिकेत या भोळ्याभाबड्या आणि अत्यंत प्रामाणिक तरुणाच्या भूमिकेचे बेअरिंग त्याने उत्तम पकडले आहे. नचिकेतची भूमिका त्याने समरसून साकारली आहे. सई ताम्हणकरने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत आणि ती कोणतीही भूमिका चपखलपणे साकारते. या चित्रपटातील भूमिकेमध्येही तिने चांगलीच कमाल केली आहे. नटखट आणि टवटवीत अशी ही भूमिका तिने झक्‍कास केली आहे. रसिका सुनील आणि ईशा केसकर यांनीही मोलाची कामगिरी केली आहे. कविता लाड, यतीन कार्येकर, सुयोग गोऱ्हे, सागर देशमुख या कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे. अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांची निर्मिती आहे. 

उपेंद्र सिधयेचे दिग्दर्शन, त्याला कलाकारांची उत्तम साथ, दमदार संवाद आणि संगीत... सगळी भट्टी चांगली जमलेली आहे. मात्र चित्रपटाची लांबी खूप आहे. त्याबाबतीत काहीसा विचार होणे अपेक्षित होते. परंतु एकूणच चित्रपट टवटवीत आणि मनाला आनंद देणारा असाच आहे. कारण प्रेमकथेवर चित्रपट कित्येक आले आणि गेले. अजूनही कित्येक येतील; परंतु उपेंद्र सिधयेने ही निवडलेली कथा आणि त्याला दिलेली ट्रीटमेंट लय भारी. त्याबद्दल उपेंद्र आणि टीमचे कौतुक. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News