गिरीश रघुनाथ कर्नाडांच्या 'प्रभावाचे अभाव' सतत भासत राहणार

कमलाकर रुगे
Tuesday, 11 June 2019

"सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे".

असे एक अद्भुत साहित्यिक कालवश झाले हे भारतीय सहित्य क्षेत्राचे खूप मोठे नुकसान आहे. रसिक वाचकांना गिरीश रघुनाथ कर्नाडांच्या 'प्रभावाचे अभाव' सतत भासत राहणार यात शंकाच नाही!

तत्कालीन मोठ्या घडामोडींना केंद्रबिंदू ठेऊन भारतीय प्राचीन, मध्ययुगीन इतिहासातील घडामोडींना प्रतिकात्मकरित्या योग्य वापर करून त्या त्या वेळी भारतीय रंगभूमीला योग्य "खत" पुरविणारे एकमेव भारतीय नाट्यलेखक म्हणजे गिरीश कर्नाड. भारतीय पूराण, उपनिषदे आणि महाकाव्ये हि खऱ्या अर्थाने भारताची ओळख आहेत. इथल्या महाकाव्यानी आजतागायत अनेक पाश्चिमात्य विद्वानांना आपल्याकडे खेचून आणलेले आहेच इतकेच नव्हे तर त्यांचे राहणीमान आणि त्यांच्या साहित्यावरसुद्धा आपला ठसा उमटविलेला आहे.

पण काळ बदलतो त्याप्रमाणे माणसाच्या अभिरुचीमध्ये देखील बदल घडत असतात. कला, साहित्य हेही कालानुप्रसंगे जुने होत जातात. आधुनिक नाट्यलेखन पर्वातील बादल सरकार बंगाली भाषा, विजय तेंडुलकर मराठी भाषा तर गिरीश कर्नाड हे कन्नड भाषेतील प्रमुख नाटककार मानले जातात. भारतीय अभिजात नाट्यकलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यामध्ये गिरीश कर्नाडांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी जवळपास चार दशके यशस्वीरीत्या उत्तमोत्तम नाटके रंगभूमीला दिले. त्यांचे बालपण कर्नाटकाच्या शिरसी या गावामध्ये गेल्यामुळे त्याकाळी तिथे सादर होणाऱ्या

नाटकांचा प्रभाव कर्नाड यांच्या लेखनावर झाला. साधारणतः १९६० पासून गिरीश कर्नाड हे भारतीय पुराणकथा, महाकाव्यातील कथा, दंतकाथांना आधुनिक नाट्यकलेची जोड देऊन भारतीय रंगभूमीच्या इतिहासामध्ये एक नवीन अविष्कार घडवून आणला. त्यांच्या एकूणच नाटकांपैकी "ययाती, तुघलक, तले-दंडा, हयवदन" हि नाटके रसिक वाचक आणि प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले आहेत. आधुनिकता नावाच्या वादळामुळे आधुनिक जगामध्ये वावरणाऱ्या मानवाच्या जीवनावर आलेल्या पेचप्रसंगांना प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक गोष्टींची एकत्रित सांगड घालून नाट्य लिहिण्याची कला कर्नाडांना अवगत झाली होती.

'तुघलक' हे १९६४ साली प्रकाशित झालेले हे नाटक मध्ययुगीन भारतातील दिल्ली सलतनतचा राजा महम्मद-बिन-तुघलकच्या कालखंडातील पेचप्रसंगाचा उपयोग रुपात्मक दृष्टीकोनातुन करत तत्कालीन नेहरू सरकारवर भाष्य करते. त्याचप्रमाणे 'हयवदन' हे १९७२ साली प्रकाशित झालेले नाट्य आधुनिक मानवाच्या "सर्वगुणसंपन्न" होण्याच्या लालसेवर ताशेरे ओढते. या नाटकातील स्त्री पात्र पद्मिनीला आपला पती विद्वान आणि शारीरीकदृष्टया बलवानही असावा असे वाटत असते.

कपिल आणि देवदत्त हे देवीला दिलेल्या वचनानुसार आपले शीर अर्पण करतात. त्याठिकाणी जेव्हा पद्मिनी पोहोचते तेव्हा आपल्या मनातील लालसा पूर्ण करण्यासाठी देवीच्या आज्ञेनुसार दोनी पुरुषांच्या धडांची अदलाबदली करते. शेवटी जेव्हा त्या तिघांना एकत्र राहणे अशक्य आहे हे कळते तेव्हा ते प्राणाहूती देतात. अशाप्रकारे 'तले-दंडा' हे नाटकसुद्धा १२व्या शतकातील समाजसुधारक महात्मा बसवेश्वरांच्या जीवनातील महत्वाच्या घटनेवर प्रकाश टाकणारे आहे. 

नाटकांसोबत कर्नाड यांनी कन्नड आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले योगदान दिले आहेत. कन्नडमधील 'संस्कार' (१९७०) या चित्रपटापासून सुरुवात झालेला अभियानाचा प्रवास हिंदीमधील 'एक था टायगर' (२०१२)ला येऊन थांबला. साहित्य क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना १९८८साली भारतीय साहित्य जगतातील "ज्ञानपीठ पुरस्कार" देऊन सन्मानीत करण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांच्या कार्याची दखल घेत  भारत सरकारने "पद्मश्री" आणि "पद्म भूषण" या पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे.

असे एक अद्भुत साहित्यिक कालवश झाले हे भारतीय सहित्य क्षेत्राचे खूप मोठे नुकसान आहे. रसिक वाचकांना गिरीश रघुनाथ कर्नाडांच्या 'प्रभावाचे अभाव' सतत भासत राहणार यात शंकाच नाही! एक वाचक म्हणून एवढेच म्हणेन की, "सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजुन ही वाटते मला की अजुन ही चांद रात आहे".

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News