#Solapur स्मार्ट सिटीत आलीय भिकाऱ्यांची टोळी! 

परशुराम कोकणे  
Monday, 7 October 2019
  • प्रमुख चौकातील सिग्नलवर ठिय्या; तान्ह्या बाळांना पुढे करून उकळले जाताहेत पैसे

सोलापूर: अर्धनग्न तान्हुल्या मुलांना कडेवर घेतलेल्या महिला... एका पायाने दिव्यांग असलेली तरुणी... दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी... एक हात नसलेला वृद्ध... हे चित्र आहे सोलापुरातल्या प्रमुख चौकांतील. नगर जिल्ह्यातून आलेल्या भिकाऱ्यांच्या टोळीने सिग्नलवर ठिय्या मांडला आहे. शारीरिक अपंगत्वाचा फायदा घेऊन लोकांना "इमोशनल" करून पैसे उकळले जात आहेत. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरात भविष्यात हे प्रमाण वाढत जाण्याची शक्‍यता आहे. 

भीक मागण्यासाठी लहान मुलांचा, दिव्यांग लोकांचा वापर केला जात आहे. रेल्वे स्थानक परिसरात मुक्कामाला असलेली ही टोळी सकाळ झाली की बाहेर पडते. शहरातील प्रमुख सिग्नल चौकात दिवसभर थांबून सायंकाळी हे लोक पुन्हा मुक्कामासाठी परत जातात. 

सिग्नल लागताच अर्धनग्न मुलांना कडेवर घेतलेल्या महिला वाहनांसमोर येतात, रिक्षा, कारच्या दरवाजापाशी थांबतात. पैसे दिल्याशिवाय ते हालत नाहीत. काही लोक भावनिक होऊन तर काहीजण भिकाऱ्यांचे शारीरिक व्यंग पाहवत नाही म्हणून पटकन पैसे देतात. या भिकाऱ्यांच्या टोळीचा म्होरक्‍या असून तो सर्वांवर नियंत्रण ठेवत आहे. या टोळीतील पुरुष मंडळी बायका, लेकरांना भीक मागायला लावून स्वत: मात्र झाडाखाली पार्टी करत असल्याचे दिसून आले आहे. 

"साहेब, गावाकडं पूर आलायं म्हणून आम्ही इकडे भीक मागण्यासाठी आलो आहोत. सोलापुरात भीक चांगली मिळते. आमच्या घरातल्या पुरुषांना पोलिसांनी नेले आहे,' असे भीक मागणाऱ्या महिलांनी सांगितले. "सकाळ" प्रतिनिधीने सदर बझार पोलिसांच्या मदतीने या महिलांची अधिक चौकशी केली. या महिला गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या कुटुंबातील असल्याचे पोलिसांनी ठामपणे सांगितले. 

महिलांनी त्यांचे मूळ गाव नगर जिल्ह्यातील कोकमठाण असल्याचे सांगितले आहे. तेथील पुराबाबत खात्री करण्यासाठी कोपरगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधला असता, तेथील पोलिसांनी दीड महिन्यापूर्वी पूर आला होता, सध्या मात्र पूरस्थिती नाही, असे सांगितले. 

  • भिकाऱ्यांच्या टोळीतील एकूण सदस्य : 15 ते 20 रुपये 
  • एका भिकाऱ्याची रोजची कमाई : 400 ते 500 
  • एका सिग्नल चौकातील भिकारी : 4 ते 5 
  • महिलांच्या कडेवर असलेल्या बाळांचे वय : 4 महिने ते 2 वर्षे 
  • सोलापुरात भीक चांगली मिळते... 

 

 

भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केला जात आहे. लहान मुले सोबत असल्यावर भीक जास्त मिळते. मुलांना भीक मागायला लावून मिळालेल्या पैशावर पालक दारू पितात, पार्ट्या करतात असे दिसून आले आहे. कधी- कधी भीक मागण्यासाठी लहान मुलांचा छळ केला जातो. भीक मागण्यासाठी काही वेळेस तान्हुले बाळ भाड्याने आणले जात असल्याचेही सर्व्हेतून समोर आले आहे. सोलापुरात भीक मागणारे बरेच लोक स्थलांतरित आहेत. पालकांच्या स्थलांतरामुळे मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहात आहेत. यातून मुलांवर वाईट संस्कारही होत आहेत. अनेक मुले लहान वयात व्यसनांच्या आहारी जात आहेत. याबाबत सामाजिक संस्था आणि शासन पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती आवश्‍यक आहे. अशा लोकांना भीक देणे टाळले पाहिजे. मुलांना समाजाच्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आम्ही प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून भीक मागणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाळा चालवत आहोत. 

- प्रसाद मोहिते, सामाजिक कार्यकर्ते 

भिकाऱ्यांच्या टोळीमुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. सिग्नलवर थांबलेल्या वाहनधारकांना पुढे जायची घाई असते. अनेकदा भीक मागणाऱ्या अंध, दिव्यांगांचा अपघातही होतो. सोलापूर शहर स्मार्ट सिटी होत असताना महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी या समस्येवर उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. 

- वाय. एम. पटेल, नागरिक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News