गांधी पुन्हा पुन्हा आठवावा लागतो... 

सुहास सोनावणे 
Monday, 29 July 2019
  • मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास काही एका रात्रीचा नव्हता.७८ वर्षाचे आयुष्य वाट्याला आलेला हा मनुष्य आपला प्रत्येक क्षण कार्यरत राहिला.

जगभरातील ६०० विद्यापीठात मोहनदास करमचंद गांधी या माणसाच्या नावावर काही अभ्यासक्रम शिकवले जातात.
जवळजवळ एक लाखाहून जास्त एवढी पुस्तके व ग्रंथ या मनुष्याच्या जीवनकार्याचा वेध घेतात. जगाच्या पाठीवर सर्वाधिक पुतळे अथवा प्रतिमा याच माणसाच्या नावाने आढळतात . जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात कुणी एक 'गांधी' उभा राहत असतो. सामान्य माणसापासून ते थोर लोकांपर्यंत ही 'मोहनमाया' पसरली आहे. तरीही गांधी पुनःपुन्हा आठवावा लागतो.

मोहनदास करमचंद गांधी ते महात्मा गांधी हा प्रवास काही एका रात्रीचा नव्हता.७८ वर्षाचे आयुष्य वाट्याला आलेला हा मनुष्य आपला प्रत्येक क्षण कार्यरत राहिला. स्वस्थ बसून राहणे हा त्याचा स्वभाव नव्हता. स्वतः काम करत राहणे आणि आपल्या सोबतच्या सर्वांना कार्यरत ठेवणे हे त्याला जडलेले एकमेव 'व्यसन' होते. कोणतेही काम त्याने हलके मानले नाही. हातात झाडू घेऊन तो साफसफाई करत राहिला, बादली घेऊन संडास धुवत राहिला, बैठक मारून तो चपला शिवू लागला, खडू घेऊन राष्ट्रीय शाळेत शिकवू लागला, प्रेसमधील मशीनची चाके गरागरा फिरवत तो वृत्तपत्र छापू लागला, स्वयंपाकघरात बसून भाजी चिरु लागला, नदीवर जाऊन पाण्याच्या घागरी भरून आणू लागला, शिवणयंत्रावर बसून आपल्या बायकोचे पोलके देखील शिवू लागला. जे जे शक्य आहे आणि समोर आहे ते ते काम तो आनंदानं करू लागला. स्वतःच 'श्रमिक' बनला आणि मग त्याने आपला भवताल देखील श्रमिकसमूह बनवून दाखवला. कोणतेही महान कार्य उभे करत असताना जीवनात समोर येणारी छोटी छोटी कामे देखील त्याच तन्मयतेने करायची असतात हा तो कृतीतून बोलून गेला. 'गांधी' आठवावा लागतो तो याकरिताच

"श्रमाशिवाय भाकरी खाणे म्हणजे चोरी " असे गांधी केवळ बोलत नसे तर त्याला पूरक असे त्याचे जीवन होते.श्रमप्रतिष्ठा हा केवळ चिंतनाचा विषय नसून तो थेट कृतीचा विषय आहे हे गांधी दाखवत होता.जगातील कोणताही श्रमकरी गांधीमध्ये स्वतःला पाहू शकतो हे त्या महात्म्याचे मोठेपण आहे. असा 'श्रमिक गांधी' समजून घ्यायला हवा इतकेच.

महान बनण्याची प्रत्येक वाट छोटया छोट्या दगडविटांनी बनलेली असते 'निर्भय' जरुर वाचा 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News