मराठी चित्रपटांचे भवितव्य मराठी प्रेक्षकांच्याच हाती - उज्ज्वला कोठारे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

मराठी चित्रपटांचे कलावंत कितीही मेहनत करीत असले तरी मराठी चित्रपटांचे भवितव्य प्रेक्षकांच्याच हाती आहे’

चाळीसगाव - ‘मराठी चित्रपटांना सध्या ‘अच्छे दिन’ आलेले असले, तरी ज्या तुलनेत दक्षिणेकडील चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो, तसा प्रतिसाद मराठी चित्रपटांना मिळताना दिसत नाही. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्याची मागणी प्रेक्षकांनी केली तर मराठी चित्रपटांचे भवितव्य आणखीन उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही.

मराठी चित्रपटांचे कलावंत कितीही मेहनत करीत असले तरी मराठी चित्रपटांचे भवितव्य प्रेक्षकांच्याच हाती आहे’, असे मत प्रख्यात कथ्थक नर्तिका तथा अभिनेत्री उज्ज्वला कानेटकर- कोठारे यांनी व्यक्त केले. 
शहरातील हॉटेल ‘ग्रीन लिफ’च्या उद्घाटनासाठी अभिनेत्री उज्ज्वला कानेटकर- कोठारे चाळीसगावात आल्या होत्या.

‘सकाळ’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी सांगितले, की आपण नृत्याच्या माध्यमातून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. सासरे महेश कोठारे दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ हा माझा पहिला चित्रपट. यातून खूप काही शिकता आले. यापूर्वी ‘एका पेक्षा एक’ व ‘अप्सरा आली’ या टी. व्ही. शो मध्ये नृत्याचे विविध प्रकार अनुभवता आले आणि यातूनच नवीन ओळख निर्माण झाली. दक्षिणेतील चित्रपटांना त्या भागातील प्रेक्षक जो प्रतिसाद देतात, तसा प्रतिसाद मराठी चित्रपटांना पाहिजे त्या प्रमाणात मिळताना दिसत नाही.

वास्तविक, मराठी चित्रपटांचे कथानक इतरांपेक्षा खूपच वेगळे असते. सध्या मराठी चित्रपटांमध्ये काळानुरुप होत असलेले बदल दिसून येत असल्याने मराठी चित्रपटांना नक्कीच चांगले दिवस आलेले आहेत. अनेक मराठी कलावंत चित्रपटांमध्ये भूमिका करताना स्वतःला झोकून देतात. त्यामुळेच अनेक चित्रपट हीट झाले आहेत.

फिल्म इंडस्ट्री ही पैशांवर चालत असल्याने मराठी चित्रपट दक्षिणेकडील चित्रपटांच्या तुलनेत आणखीन यशस्वी होण्यासाठी प्रेक्षकांचाच प्रतिसाद महत्त्वाचा आहे. चित्रपटगृहांमध्ये जाऊन मराठी चित्रपट पाहिल्यानंतरच आर्थिक स्रोत वाढतो. त्यामुळे प्रेक्षकांनी त्यादृष्टीने विचार केला तर मराठी चित्रपटसृष्टी नंबर एक झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले. 
जिद्द, चिकाटी ठेवावी 
अभिनयाच्या क्षेत्रात येणाऱ्या नवोदीत कलावंतांनी जिद्द आणि चिकाटी ठेवली तर यश मिळेतच असा आपला अनुभव असल्याचे उर्मिला कानेटकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, की करिअर करण्यासाठी अनेक क्षेत्र असली तरी तुमच्यात जर टॅलेंट असेल, तर यशाचे शिखर गाठण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. सध्याचे युग स्पर्धेचे असल्याने त्या दृष्टीने तरुण- तरुणींना अभिनय क्षेत्रात यायचे असेल तर प्रयत्नवादी असले पाहिजे. आपल्याकडे अभिनयाच्या संदर्भात अजूनही पाहिजे तशी जनजागृती होताना दिसत नाही. असे असले तरी हे क्षेत्र नवोदीत कलाकारांना उभारी देणारे क्षेत्र आहे, तेव्हा स्वतःमधील गुणवत्ता ओळखून अभियनाच्या क्षेत्रात यावे, असे त्यांनी सांगितले. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News